फोंडा : सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. आठवले यांचा ८१वा जन्मोत्सव सप्तर्षींच्या आज्ञेने यंदा ‘ब्रह्मोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. सनातन संस्थेचे गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतून आलेले दहा हजारांहुन अधिक साधक या समारंभाला उपस्थितीत होते. गोव्यातील फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर या ‘ब्रह्मोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले. आंध्र प्रदेशातील तिरुपती श्री बालाजी देवस्थानतर्फे सुवर्ण रथातून श्री बालाजीची शोभायात्रा काढण्यात येते. तिला ‘ब्रह्मोत्सव’ म्हणतात. त्याप्रमाणेच या वेळी डॉ. जयंत आठवले यांची सागवानपासून साकारलेल्या मूर्तीची सुवर्ण रथातून रथयात्रा काढण्यात आली.
झारखंड येथील प्रदीप खेमका, सुनिता खेमका, दिल्ली येथील संजीव कुमार, ‘पितांबरी’ उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुदेसाई आणि कर्नाटक येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा संघचालक राजन भोबे, महालसा मंदिरांचे अध्यक्ष प्रेमानंद कामत, गोमंतक संत मंडळाचे संचालक ह.भ.प. सुहास बुवा वझे, गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष भाई पंडित आणि कोकणी साहित्यिक महेश पारकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वर्ष २०२१ मध्ये झालेल्या डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा लघुपट दाखविण्यात आला. त्यानंतर काढण्यात आलेल्या रथयात्रेत धर्मध्वज, मंगलकलश घेतलेल्या सुवासिनी, ध्वजपथक, टाळपथक इत्यादी ‘श्रीमन्नारायण नारायण…’ या धुनीवर मार्गक्रमण करत होते. सुवर्ण रथात डॉ.आठवले यांच्यासह त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी बिंदा सिंगबाळ आणि अंजली गाडगीळ विराजमान होत्या. नृत्यपथकाने ‘अच्युताष्टकमा’वर आधारित नृत्य सादर केले. ‘आत्मारामा आनंदरमणा’ हे गीत देखील सादर करण्यात आले. आभार प्रदर्शन आणि रथ दर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने एप्रिल आणि मे महिन्यांत सनातन संस्थेद्वारा देशभरात ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गंत अनेक प्राचीन मंदिरांची स्वच्छता, शेकडो मंदिरांमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना, प्रवचने ‘हिंदु एकता दिंडीं’चे आयोजन करण्यात आले. यात मोठ्या संख्येने हिंदू बंधुभगिनी
सहभागी झाले होते.