Home » दक्षिणेत कमळ कोमेजले; पंजा बळकट

दक्षिणेत कमळ कोमेजले; पंजा बळकट

by नवस्वराज
0 comment

बेंगळुरू : भाजपाच्या ताब्यातील दक्षिणेतील एकमेव राज्य कर्नाटक काँग्रेसने सफाईदारपणे हिसकावून घेतले आहे. मतमोजणी सुरू असताना काँग्रेस बहुमताकडे आगेकूच करीत आहे. त्यामुळे दक्षिणेतील एकमेव राज्यात कमळ कोमेजले असून पंजा बळकट झाला आहे. कर्नाटक विधानसभेच्या निकालांमुळे काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे. भाजपाला मात्र पराभवामुळे आत्मचिंतन करावे लागणार आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यासह अनेकांना दूर करणे भाजपाला भोवले आहे. याशिवाय कर्नाटक सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा काँग्रेसने लाऊन धरला. कर्नाटकातील भाजपा सरकारला ४० टक्के कमिशनवाले सरकार म्हणून संबोधले जाऊ लागले. निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तसतसा हा मुद्दा गंभीर होत गेला. त्याचा फटका भाजपाला बसला. बसवराज बोम्मई यांची कोणतीही जादू या निवडणुकीत चालली नाही. काँग्रेसजवळ प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या असे तगडे चेहरे होते.

कर्नाटकात भाजपा राजकीय समीकरण साधू शकली नाही. भाजपाने कोअर व्होट बँक लिंगायत समाजाला आपल्याशी जोडून ठेवले नाही. दलित, आदिवासी, ओबीसी आणि वोक्कालिंगा समाजाचे मनही भाजपा जिंकू शकले नाहीत. काँग्रेस मुस्लिमांपासून ते दलित आणि ओबोसीला जोडुन ठेवण्यासह लिंगायत समाजाची मते मिळवण्यातही यशस्वी ठरली. कर्नाटकमध्ये भाजपा नेते हलाला, हिजाबपासून ते अजानपर्यंतचा मुद्दा उचलत होते. पण निवडणुकीवेळी हनुमानाची चर्चा सुरू झाली आणि भाजपाचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याची योजना अयशस्वी झाली. काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले होते तर भाजपाने बजरंग दलाला थेट हनुमानाशी जोडले. हा सगळा देवाचा मुद्दा करुन टाकला. भाजपाने हिंदुत्वाचे कार्ड खेळले पण त्याचा काही फायदा झाला नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!