Home » शनी शिंगणापूरमध्ये मूर्तीजवळ आता केक कटिंग नाही

शनी शिंगणापूरमध्ये मूर्तीजवळ आता केक कटिंग नाही

by नवस्वराज
0 comment

शनी शिंगणापूर : श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर येथे शनैश्चर देवस्थान असून याठिकाणी शनी जयंतीच्या उत्सवादरम्यान केक कापण्यास मनाई करावी अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून भाविक येथे पाश्चात्य पद्धतीने केक कापत शनी जयंती साजरी करीत आहे. त्याला विरोध झाल्यानंतर आता मंदिर प्रशासनाने असा प्रकार होणार नाही, याची ग्वाही दिली आहे.

शनी शिंगणापूर येथील शनैश्चर मंदिरात भारतासह विदेशातील भाविकही दर्शनासाठी येतात. गेल्या तीन ते चार वर्षांपासून येथे शनी जयंतीला केक कापण्याची पद्धत सुरू झाली आहे. ही पद्धत अशास्त्रीय व भारतीय आध्यात्मिक परंपरेच्या विरुद्ध असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. या प्रथेला कोणताही शास्त्रीय आधार नाही. शनैश्चर देवस्थानाच्या लिखित घटनेतही तसा उल्लेख नाही. त्यानंतरही केक कापण्याची प्रथा रूढ होत असल्याबद्दल महासंघाने नाराजी व्यक्त केली आहे.

केक कापण्याच्या या पाश्चात्त्य प्रथेला देवस्थानने प्रतिबंध करावा, अशी मागणी शनी जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर येथील श्री शनैश्चर देवस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांना देण्यात आले. मंदिर महासंघाच्यावतीने रामेश्वर भुकन, गोरख भराडे, सतीश वावरे, किरण बानकर, ज्ञानेश्वर जमदाडे आणि सागर खामकर, सुनिल घनवट उपस्थित होते. असा प्रकार यापुढे होऊ नये म्हणून देवस्थानच्यावतीने योग्य ती काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी शेटे यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले,असे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समनव्यक  सुनील घनवट यांनी कळवले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!