Home » Lok Sabha Election : योगी आदित्यनाथ यांची अकोल्याकडे पाठ

Lok Sabha Election : योगी आदित्यनाथ यांची अकोल्याकडे पाठ

Akola Constituency : फडणवीसांचीही सभा रद्द 

by admin
0 comment

Political News : विदर्भात लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. दुसऱ्या फेज मधील निवडणूक अकोला येथील लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे. अकोल्यात महायुतीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक येणार होते. मात्र अशातच स्टार प्रचारकांनी अकोल्याकडे पाठ फिरवलेली दिसत आहे. यामुळे अकोल्यात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना लोकसभेची खिंड एकट्याला लढवावी लागणार आहे.

सभा रद्द..

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीच्या प्रचारासाठी  मुर्तीजापूर, अकोला येथे 20 एप्रिल रोजी सभा घेणार होते. तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 21 एप्रिल रोजी सभेसाठी येणार होते. फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांच्या स्वागतासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी फडणवीसांची सभा दोनवेळा रद्द झाली. योगी आदित्यनाथ यांच्या सभेचेही अकोल्यात पोस्टर्स लावण्यात आले होते. परंतु ही सभा देखील रद्द झाल्याची माहिती आहे. आता केवळ चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा 22 एप्रिल रोजी होईल अशी माहिती आहे. अकोल्यात मतदानाला सात दिवस शिल्लक आहेत. या उर्वरित दिवसांमध्ये एकातरी स्टार प्रचारकाची सभा व्हावी, अशी मागणी अकोल्यातील भाजप व भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

काँग्रेसही बॅकफूटवर

अकोला मतदारसंघाच्या ग्रामीण भागामध्ये काँग्रेसने भाजपच्या तुलनेत प्रचारात आघाडी घेतली आहे. असे असले तरी भाजप प्रमाणे काँग्रेसनेही अकोला लोकसभा मतदारसंघात एकही स्टार प्रचारक उतरवलेला नाही. राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची सभा तर दूर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनाही अकोला लोकसभा मतदारसंघात पाठवलेले नाही. याशिवाय काँग्रेसला पाठबळ देणारे शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील अकोला लोकसभा मतदारसंघात एकाही सभेची नियोजन केलेले नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!