Amravati अमरावतीच्या पंचवटी चौकात तरुणाने स्वतःवर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची घटना समोर आली आहे. भररस्त्यात तरुणाने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे या तरुणाचे प्राण वाचले. आगीवर नियंत्रण मिळवत स्थानिकांनी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. हा थरारक प्रसंग येथील पंचवटी चौकात सोमवारी दुपारी घडला. प्रवीण रामराव देशमुख (२७, रा. लक्ष्मीनगर) असे या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या युवकाचे नाव आहे. असे टोकाचे पाऊल त्याने का उचलले याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही.
या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी प्रवीणला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तो बेशुद्धावस्थेत असल्याने त्याचा जबाब नोंदवता आलेला नाही. या प्रकाराची माहिती प्रवीणच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. प्रविण 60 टक्के भाजल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे. प्रवीण वर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.