नागपूर : तळागाळातील समाजाबद्दलची संवेदना असलेला, त्यांच्या उन्नतीसाठी कार्य करणारा, माणसाला जोडून ठेवणारा नंदा खरे हा माणूस होता, अशा सद्भावना मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आल्या.
ख्यातनाम साहित्यिक अनंत यशवंत खरे ऊर्फ नंदा खरे यांना विदर्भ साहित्य संघातर्फे गुरुवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विदर्भ साहित्य संघाचे सांस्कृतिक संकुलातील अमेय दालनात झालेल्या श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे होते. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व लेखक श्रीनिवास खांदेवाले, ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ व डॉ. प्रमोद मुनघाटे, प्रफुल्ल शिलेदार, कल्याणी देशमुख यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
डॉ. मुनघाटे म्हणाले, प्रतिभावंत लेखक, लोकशिक्षक आणि मूल्यांशी बांधिलकी असे तीन गुण नंदा खरे यांच्यामध्ये होते. नायकाचे उदात्तीकरण करणारा ऐतिहासिक कादंबरीचा प्रवाह सुरू झाला पण नंदा खरे यांनी ‘अंताजींची बखर’ या कादंबरीतून वेगळी वाट धरली. त्यांनी ऐतिहासिक कादंबरीला नवीन वळण दिले, असे ते म्हणाले. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी नंदा खरे यांचे नागपूर, विदर्भावर किती प्रेम होते. यांचे दाखले दिले. विदर्भातील नद्या, नाले, तलाव, लोकसंस्कृती, परंपराचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी तरुणांना प्रेरित केले. अनेक तरुण मुलांच्या आयुष्याला त्यांनी आकार दिला, असे त्यांनी सांगितले.
डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, शिस्त, सामाजिक संवेदनशीलता आणि नैतिकता नंदा खरे यांच्यामध्ये दिसून येते. व्यवसायामुळे त्यांना तळागाळातील समाज पाहता आला, त्याचे विश्लेषण करता आले आणि त्यातून त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले. पाश्चात्य आधुनिक विचार व भारतीय समाजातील प्रश्न यांची सांगड घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी निर्माण केलेले शाब्दिक भांडवल समाजाच्या विकासासाठी वापरणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.
एकीकडे स्वतंत्र लेखन, दुसरीकडे वैचारिक लेखन आणि तिसरे म्हणजे अनुवाद अशी चौफेर मुशाफिरी दिवंगत नंदा खरे यांनी साहित्याच्या क्षेत्रात केली. अनेक प्रयोग त्यांनी कादंबरीतून केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, अनुवादक प्रफुल्ल शिलेदार यांनी केले. विवेकवादी, विज्ञानाधिष्ठीत भूमिका आणि सत्याची कास ही दिवंगत नंदा खरे यांच्या व्यक्तिमत्वाची त्रिसूत्री होती, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. शोभणे यांनी विदर्भ साहित्य संघाचा सर्वोच्च सन्मान जीवनव्रती पुरस्कार देऊ केला होता तो त्यांनी नाकारला. त्यामुळे एका योग्य व्यक्तीला सन्मानित करण्यापासून वि.सा. संघ वंचित राहिला, अशी भावना व्यक्त केली. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, विज्ञानाचा व्यासंग असलेल्या नंदा खरे यांची ललित लेखनातील त्यांची कामगिरी अविस्मरणीय झाले आहे, असे ते म्हणाले.