अकोला : कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी बॉलिवूडला लक्ष्य करत टीका केली आहे. पठाण असो किंवा अन्य कोणताही चित्रपट या सर्वांवर बहिष्कार टाका, असे आवाहन कालीचरण महाराज यांनी प्रेक्षकांना केले आहे.
धर्माच्या विरोधात जाऊन सिनेमा बनवणाऱ्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला पाहिजे, तसेच अशाप्रकारचे चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यांना भिकारी बनवा, असे ते म्हणाले. धर्माचा अपमान करणार्या सर्व देशद्रोही चित्रपटांवर पूर्णपणे बहिष्कार घाला, आणि अशाप्रकारे धर्माचा अपमान करणार्यांना धडा शिकवायला पाहिजे. असे चित्रपट बनवणाऱ्यांना भिकारी बनवले पाहिजे. त्यांच्यासाठी हीच शिक्षा आहे. धर्माचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे ते म्हणाले.
कालीचरण महाराज यांचा अकोला आणि मध्य प्रदेशात मोठा समर्थक वर्ग आहे. या भागातील तरुणाई कालीचरण महाराज यांना ‘फॉलो’ करते. मध्यंतरीच्या काळात कालीचरण महाराज काही वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. महाराष्ट्र विधानसभेतही त्यांचे नाव गाजले होते.