नागपूर : श्रीकृष्णाचा जन्म वाईट मुहूर्तावर झाला होता, असे सांगितले जाते. सर्व वाईट गोष्टींवर आपण आपल्या चांगल्या गुणांनी, चांगल्या वर्तनाने, चांगल्या कर्माने मात करू शकतो आणि आपले भाग्य बदलू शकतो, याची शिकवण श्रीकृष्णचरित्राने दिली असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शैलेश पानगावकर यांनी व्यक्त केले.
ऋतुराज प्रस्तुत व सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ बिहेविअरल सायन्सेस यांच्या सौजन्याने कृष्णभक्तीचे मानसशास्त्र उलगडणारा संगीतमय कार्यक्रम ‘मनमोहना’ सायंटिफीक सभागृहात पार पडला. सायंटिफिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाची संकल्पना ऋतुराजच्या संचालक मुग्धा तापस यांची होती. डॉ. शेलेश पानगावकर यांनी कृष्णाचा व्यक्तिमत्वामागचा, त्यांच्या प्रत्येक कृतीमागचा मानसशास्त्रीय दृष्टीकोण समजावून सांगितला. प्रसिद्ध गायक गुणवंत घटवाई व मंजिरी वैद्य-अय्यर यांनी ‘ओम नमो भागवते वसुदेवाय’ या कृष्णभक्तीगीताने कार्यक्रमाची भक्तिमय आणि सुरेल सुरुवात केली. शंखाचा निनाद आणि त्याला लाभलेली संगीतमय साथ यामुळे वातावरण कृष्णमय झाले होते.
कृष्णाच्या बाललीलांमध्ये लोण्याची चोरी करण्याची नकारात्मक कृतीदेखील इतकी गोड वाटते की त्यामुळे ‘मखानचोर’ असे प्रेमळ नाव त्याला पडले होते. गोपिकांची खोडी काढणारा बालकृष्ण ते कुरुक्षेत्रात अर्जुनाला उपदेश करून गीता सांगणारा भगवान श्रीकृष्ण किती असीम आणि अथांग असेल, याची अनुभूती त्याच्या प्रत्येक कर्मात, कृतीत येते, असे डॉ. पानगावकर म्हणाले.
बुद्धीला कृतीची मीमांसा कळत नाही तेव्हा ती लीला वाटते. परंतु, त्याचे मानसशास्त्रीय दृष्टीने विवेचन केले तर त्या कृतीचे विविध कंगोरे आपल्याला कळतात. कृष्णाच्या प्रत्येक कृतीतून सुयोग्य वागणुकीचे धडे मिळतात आणि तेच नेमके आत्मसात करायचे आहे, असे ते म्हणाले.
गायकांनी सादर केलेल्या ‘मन कृष्णचरित’ या गीत कृष्णाच्या विविध रूपांचे पैलू मांडणे असो वा कृष्णजन्माचे ‘आज आनंदी आनंद झाला’ हे गीत असो, अशी विविध कृष्णगीतांनी वातावरण भारून गेले होते. कृष्णजन्माष्टमीच्या पर्वावर रसिकांनी ऋतुराजतर्फे ही आगळीवेगळी सुमधूर पण तितकीच तात्विक भेट मिळाली. ऋत्वी तापस, आर्या घटवाई, आसावरी कायंदे व तनाया चाफले यांचेही सहकार्य लाभले. गायकांना परिमल जोशी, श्रीकांत पिसे, शुभम चोपकर, मोरेश्वर दहासहस्त्र, विक्रम जोशी व मुग्धा तापस यांची उत्तम वाद्यसंगत लाभली. किशोर गलांडे यांनी कृष्णाच्या विविध लीला, कर्मांच्या अनुषंगाने डॉ. पानगावकर यांना बोलते केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.