– प्रसन्न जकाते
नागपूर : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय बुद्धीबळामध्ये शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे जरी पटावरील गोट्या फिरवत असले तरी या डावामागील खरा ‘वजीर’ कोण हे महाराष्ट्रापासून लपून राहिलेले नाही. कर्नाटक, मध्य प्रदेशानंतर भाजप सत्ता काबीज करण्यासाठी महाराष्ट्रातही ‘ऑपरेशन लोटस’ राबवित आहे, हे कापसाच्या बोळ्याने दूध पिणारा लहान मुलगाही सांगू शकेल.
भाजपच्या या ‘ऑपरेशन लोटस’ची सुरुवात झाली ती 2008 मध्ये कर्नाटक राज्यातून. कर्नाटक विधान सभेत 10 जागा कमी पडत असताना भाजप नेते जनार्दन रेड्डी यांनी पहिल्यांदा ‘ऑपरेशन लोटस’ हा शब्द वापरला. तेव्हा पासून तोच शब्द भाजप आणि प्रसार माध्यम वापरत आहेत. कर्नाटकमध्ये त्यावेळी भाजपने साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून सत्ता मिळवली. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि अमित शहा अध्यक्ष झाल्यावर तर ‘ऑपरेशन लोटस’ला जोरच आला.
पुन्हा कर्नाटक आणि त्यानंतर मध्य प्रदेशामध्ये भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी करून दाखवले. 2019 मध्ये कर्नाटकात भाजपला 104 आणि काँग्रेसला 80 जागा मिळाल्या होत्या. 37 आमदार असलेल्या जनता दल (सेक्युलर) सोबत काँग्रेसने खुर्ची अर्धी वाटली आणि कुमारस्वामी मुख्यमंत्री झालेत. परंतु येडीयुरअप्पा आणि केंद्रातील भाजपने सरकारमध्ये सुरू असलेली धुसफूस ओळखली. 14 महिन्यानंतर कर्नाटक सरकारमधील 16 आमदार फुटले. ते भाजपच्या गळाला लागले आणि पुन्हा येडीयुरअप्पा यांचा मुख्यमंत्रिपदी राज्याभिषेक झाला.
2020 मध्ये मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता आली. राजस्थान, मिझोरम, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या पाच राज्यात त्यावेळी विधान सभा निवडणूक झाली होती. त्यापैकी तीन राज्य काँग्रेसने काबीज केली होती. मध्य प्रदेशात भाजप 109, काँग्रेस 114 असे संख्याबळ होते. बहुमताचा आकडा होता 116 जागांचा. खुर्चीवरून काँग्रेसमध्ये कमलनाथ विरुद्ध ज्योतीरादित्य शिंदे ‘वॉर’ सुरू असल्याचे भाजपने हेरले. मार्च 2020 मध्ये मध्य प्रदेशाच्या राजकीय विश्वात असे वादळ उठले की 10 आमदार फुटले. त्यांना कमलनाथ परत आणेस्तोवर राज्यात भाजपची सत्ता आली होती आणि मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंह चव्हाण शपथ घेत होते.
उत्तराखंड, राजस्थानमध्ये मात्र ‘ऑपरेशन लोटस’ला यश आलेले नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणविस आणि अजित पवार यांचे काही तासांचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ फसले असे बोलले जाते, पण आपल्याजवळ बहुमत नाही हे माहिती असूनही शपथ घेण्याईतके देवेंद्र फडणवीस नक्कीच खुळे नाही व त्यांना त्यावेळी साथ देणारे अजित पवारही. त्यामुळे काही तासांच्या सरकारने काय साध्य केले हे फडणवीस आणि पवार यांनाच ठाऊक.
बरं त्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीला भाजपने स्वस्थ बसूच कुठे दिले. संजय राठोड, भावना गवळी, अनिल देशमुख, नवाब मलिक असे पटावरील एकएक करीत मातब्बर व्यक्ती वेगवेगळ्या ‘प्याद्यांचा’ आणि चालिंचा वापर करून भाजपने गारद केले. अर्थात या मातब्बरांनी चुकाही तशा केल्या व त्या भाजपच्या हाती लागल्या. आता भाजपने देवेंद्रास्त्राचा वापर करीत एकनाथाच्या मदतीने आपल्या लक्षावर ‘बाण’ सोडत निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या या राजकीय बुद्धीबळात पडद्यामागे असलेला ‘वजीर’ प्रतिस्पर्धी सेनेतील राजाला शह आणि मात देण्यात यशस्वी ठरणार काय, हे लवकरच स्पष्ट होईल.