Independence War : देशप्रेमाने ओतप्रोत शक्तीशाली व्यक्तीमत्वांचा विचार जेंव्हा आपल्या मनात येतो, तेंव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद एक महान युवा क्रांतिकारी होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बेधडकपणे आपल्या प्राणांची आहुती दिली. आपल्या पराक्रमाची आणि शौर्याची गाथा त्यांनी स्वतः रचलेली आहे. मातृभूमीची दुर्दशा बघून जर तुमचे रक्त सळसळत नसेल, तर ते रक्त नव्हे, पाणी आहे, असे आझाद यांचे परखड मत होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांचे योगदान विसरणे शक्य नाही.
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्य प्रदेशातील भाभरा गावी झाला. चंद्रशेखर सीताराम तिवारी हे त्यांचे मूळ नाव. त्यांचे वडील अत्यंत प्रामाणिक, स्वाभिमानी, आणि दयाळू वृत्तीचे होते. दुष्काळ पडल्याने बदरका हे आपले मूळ गाव सोडून कुटुंबासह ते भाभरा या गावी स्थायिक झालेत. भिल्ल वस्तीत चंद्रशेखर आझाद याचे बालपण गेल्याने त्या मुलांसारखे आझाद यांना देखील धनुष्यबाण उत्तम रीतीने चालवता येत होता. बालपणापासून चंद्रशेखर आझाद यांना अन्यायाची चिड होती. अन्यायाविरूद्ध त्यांचे मन पेटून उठायचे. अभ्यासात त्यांचे मन कधीच रमले नाही. त्यांना खेळण्याची जबरदस्त आवड होती. ते आणि त्यांचे भाऊ सुखदेव यांना शिकविण्यासाठी मनोहरलाल त्रिवेदी हे त्यांच्या वडिलांचे मित्र घरी यायचे.
आझाद संस्कृतचे विद्वान व्हावे अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्यासाठी त्यांना वाराणसी येथील काशी विद्यापीठात पाठविण्यात आले. 1921 मध्ये महात्मा गांधींनी असहकार आंदोलनाची घोषणा केली. चंद्रशेखर आझाद त्यावेळी फक्त 15 वर्षांचे होते. देशभक्तीच्या भावनेने झपाटलेले आझाद गांधीच्या असहकार आंदोलनात सहभागी झालेत. त्यांना अटक झाली. न्यायालयात न्यायाधीशांनी नाव विचारल्यावर त्यांनी आझाद असे सांगितले, वडीलांचे नाव स्वतंत्र आणि निवासस्थान तुरुंग सांगितले. आझादच्या उत्तराने संतापलेल्या न्यायाधीशाने त्यांना 15 फटक्यांची शिक्षा सुनावली. आझाद यांनी शिक्षा पत्करली. प्रत्येक फटक्यानिशी भारत माता की जयचा नारा दिला. याघटनेनंतर चंद्रशेखर तिवारी हे, आझाद नावाने प्रसिद्ध झालेत.
1922 मध्ये महात्मा गांधींनी आझाद यांना असहकार चळवळीतून काढले. या गोष्टीचे आझाद यांना फार वाईट वाटले. त्यांनी इंग्रजांच्या गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वतंत्र करण्याची शपथ घेतली. पुढे त्यांची भेट हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक रामप्रसाद बिस्मिल यांच्याशी झाली. ही एक क्रांतिकारी संघटना होती, या संघटनेत सर्वांना समान अधिकार होता. कुणाशीही भेदभाव केला जात नसल्याने आझाद फार प्रभावित झालेत. त्यांच्या नेतृत्वात संस्थेनी इंग्रजांच्या तिजोऱ्या लुटून संघटनेकरता निधी गोळा केला. चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या दहा सहकाऱ्यांनी 1925 मध्ये इंग्रजांचा खजिना नेणाऱ्या ट्रेनला लुटून इंग्रजांपुढे मोठे आवाहन उभे केले. आझाद यांनी तडीस नेलेल्या काकोरी कांडाची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरात झाली आहे.
काकोरी प्रकरणात चंद्रशेखर आझाद यांचा महत्वपूर्ण वाटा होता. महान क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, राजेंद्रनाथ लाहिडी, ठाकूर रोशनसिंह यांना या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली होती. यानंतर चंद्रशेखर आझाद यांच्यापुढे संघटनेला नव्याने उभारी देण्याचे आव्हान उभे राहिले. ते इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन दिल्लीला निघून गेले. तेथे त्यांनी क्रांतीकारकांची एक सभा आयोजित केली. त्यावेळी त्यांची भेट भगतसिंग यांच्याशी झाली. महत्त्वाच्या बाबतीत भगतसिंग त्यांचा सल्ला घेत असत. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनने पुन्हा क्रांतिकारी मार्गांचा जोरदार अवलंब केल्याने इंग्रज चंद्रशेखर आझाद यांच्या मागावर होते. लाला लजपत राय यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी 1928 मध्ये चंद्रशेखर आझाद यांनी सांडर्स या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली.
संघर्षाच्या मार्गावर हिंसा ही मोठी गोष्ट नाही, असे आझाद नेहमी म्हणायचे. इंग्रजांच्या असेम्ब्लीत बॉम्ब स्फोट करण्यासाठी आझाद यांनी भगतसिंग यांना मदत केली. भगतसिंगांना अटक झाल्यावर त्यांना सोडवण्यासाठी आझाद यांनी भरपूर प्रयत्न केले. परंतु बलशाली इंग्रज सैन्यापुढे त्यांचा नाईलाज झाला. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी फाशीची शिक्षा सुनावली. चंद्रशेखर आझाद या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत व्हावे, यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यासाठी ते अलाहाबाद येथे आले होते. इंग्रजांना याचा सुगावा लागला. त्यांनी चंद्रशेखर आझाद असलेल्या अल्फ्रेड पार्कला चारी बाजूंनी घेरले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. चकमकीदरम्यान एक क्षण असा आला की आझाद यांच्या बंदुकीत केवळ एकच गोळी शिल्लक होती. त्यामुळे इंग्रजांच्या हातून मरण्यापेक्षा त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत वीरमरण पत्करले. भारतमातेचा वीर सुपुत्र अमर झाला. चंद्रशेखर आझाद यांची शौर्यगाथा इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरली गेली.