मीनल चतुरपाळे | Meenal Chaturpale
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।।
धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटले जाते. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो.
पण… आपल्या भाषेचे जपन आपण करतो का? हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा, म्हण्याचा उद्देश हाच की आपण मुळात इंग्रजी भाषेत गुंतवून बसलो आहे.. चला तर पाहूया आजचा लेख
कुसुमाग्रजांनी मराठीतून अनेक कविता, लघुकथा, निबंध, नाटके आणि कादंबरी आदी सुंदर साहित्याची रचना केली. 1942 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारा कवितासंग्रह ‘विशाखा’ त्यांच्या सर्वांत प्रसिद्ध लिखाणापैकी एक. मराठी भाषा दिन महाराष्ट्र सरकारने आता अधिकृतपणे जाहीर केला आहे. मराठी मुख्यतः महाराष्ट्र व गोव्यात बोलली जाते. जगभरात मराठी दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. भारतात बोलल्या जाणाऱ्या एकूण भाषांपैकी मराठी तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. मराठी ही जगातील प्राचीन भाषेपैकी एक आहे. संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात आपल्या साहित्यातून मराठी भाषेचा महिमा गायला होता.
मराठीचा उगम
मराठी भाषेचा उगम नवव्या शतकात झाल्याचे सांगण्यात येते. मराठी संस्कृतपासून तयार झाली आहे. पैठण येथील सातवाहन साम्राज्याच्या प्रशासन काळात महाराष्ट्री भाषेचा सर्वप्रथम वापर झाला. त्यानंतर देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी झाली. म्हाईम भट यांनी लिळा चरित्र लिहिले. त्यातही मराठीचा वापर झाला. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती देखील संस्कृतशी साधर्म्य असलेल्या मराठीतून. त्याला प्राकृत भाषाही म्हटले जाते. संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली. अनेक संताच्या कीर्तनांनी, ओव्यांनी, भजनांमधून मराठी भाषा सजत केली.
मराठी भाषेला अनेक साहित्यिकांच्या लेखणीले समृद्ध केले. संपन्नत केले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे रक्षण केले. त्यांनीच मराठी भाषेसाठी पहिला राज्यकोष तयार केला. मराठी भाषा ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असली तरी गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड, दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशातील काही भागातसुद्धा मराठी भाषा बोलली जाते. भारताव्यतिरिक्त परदेशात देखील मराठीचे अस्तित्व आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत इतर भाषा लिहिता, वाचता व बोलता येणेही गरजेचे आहे. परंतु त्यासाठी मराठी कायमची सोडून देणे हा काही उपाय नाही. मराठी भाषेतील साहित्य नव्या पिढीला अवगत करून दिले पाहिजे. संतांच्या रचना, त्यांचे अर्थ, शब्दांचे अर्थ, म्हणी, वाकप्रचार याचे ज्ञान घराघरात दिले गेले पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकू की, ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’
महाराष्ट्रात मराठी माणसाची टक्केवारी घसरली
महाराष्ट्राला मराठी भाषिकांचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. आजवर अनेक लेखकांनी आपल्या लेखनाने मराठी भाषेच्या साहित्यात भर घातली आहे. अनेक साहित्यकृतींमुळे मराठी भाषा जगभरात पोहोचली आहे. 2011 मधील जणगणनेनुसार भारतात मराठी भाषकांची एकूण संख्या 9 कोटी आहे. महाराष्ट्रात 67 टक्के मराठी माणूस आहे, म्हणजे ज्यांची मातृभाषा मराठी आहे. महाराष्ट्रातील तीन माणसांमागे दोन माणसे मराठी आहेत. महाराष्ट्राची स्थापना झाली तेंव्हा राज्यात मराठी माणसाचा टक्का 75 होता. त्याअगोदर म्हणजे आजपासून शंभर वर्षांपूर्वी मराठी माणसाचा महाराष्ट्रातील टक्का 95 होता. याचा अर्थ महाराष्ट्रात मराठी माणसाची टक्केवारी घसरली आहे. इतर भाषिकांची संख्या वाढली आहे.
अशीच स्थिती कायम राहिली तर 2025 पर्यंत मराठी माणसाची सध्याची 67 टक्के संख्या घसरून 60 टक्क्यांवर येईल, असा धोका व्यक्त होत आहे. मराठी ज्यांची मातृभाषा आहे अशी माणसं महाराष्ट्रात अल्पसंख्यांक होतील अशी भीती व्यक्त होत आहे. आज अनेक लोक मराठी असूनही मराठी भाषेत बोलत नाही. हिंदी, इंग्रजीवर त्यांचा भर असतो. बालकांनाही मराठी बोलण्याची सवय नसते. शाळेत, कार्यालयीन कामकाजात, न्यायदानाच्या कामात, बँकांमध्ये, रस्त्यावरील पाट्यांवर, टीव्हीवरून मराठीचा किती वापर होतो हा चिंता आणि चिंतनाचा विषय आहे. मराठी भाषेचे संवर्धनासाठी प्रयत्न करणे त्यामुळे गरजेचे झाले आहे. एखादी भाषा संवर्धित करताना त्या भाषेचा अधिकाधिक वापर कसा करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे असते. मराठी भाषिकांची संख्या ही अधिक असली, तरी मराठी बोलणाऱ्याची संख्या तुलनेने कमी होत चालली आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणारी पिढी लोप पावत आहे. त्यामुळे मराठी मुलेही बोलताना आपल्या मातृभाषेचा वापर न करता अन्य भाषेत संभाषण करू लागले आहेत. व्यावहारिक कामांमध्ये आजही इंग्रजीचा पगडा कायम दिसतो.
यातच सर्व शिक्षण आणि तंत्रज्ञान इंग्रजीतूनच, मग करायचे काय?
कशी जपायची आपली बोली भाषा, जपायची ती आपल्याच बोली भाषेतून
सर्वच भाषेचे आज महत्व आहे. पण आपल्याला आपल्या बोली भाषेतून बोलता आले पाहिजे म्हणजे आपुलकीचे नाते जपता येईल.
मराठी भाषा आहे अमुच्या महाराष्ट्राची शान
भजन, कीर्तन, भारुड ऐकून हरपून जाते भान
काना, मात्रा, वेलांटीचे मिळाले आहे वाण,
साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान,
अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व
मराठी भाषा गौरव दिन आनंदाने साजरे करू सर्व…
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!