– प्रा. डॉ. महेश चं. डाबरे
कोणतेही शहर म्हटले की, ते सुंदर, स्वच्छ आणि सर्व सुविधांनी युक्त असावे, असे अपेक्षित असते. अकोला शहराच्या बाबतीतही जनसामान्यांच्या अपेक्षा अशाच काही आहेत. रस्ते चांगले असावेत. स्ट्रिट लाईटची सुविधा असावी. पिण्याचे स्वच्छ पाणी नियमित मिळावे. नाल्या व नाले यांची नियमित स्वच्छता व्हावी. घाण कचरा साचू नये इत्यादी, इत्यादी. अकोला महानगरपालिका स्थापन होवून एक दशक पूर्ण झाले आहे. मात्र शहर कसे भकास वाटते. प्रशासन निद्रीस्त आहे काय ? असे वाटायला लागते.
अकोला शहरात फेरफटका मारला तर लक्षात येते की, येथील रस्त्यांना गुणवत्ता नाही. नविन सिमेंटच्या रस्त्यांना खड्डे पडले आहेत. वाहने चालवितांना पूर्ण सर्कस करावी लागते. जोडरस्ते पार करताना तर पूर्ण कसरतच होते. रस्ते खरे तर जमिनीला समतल असावे. मात्र येथे रस्त्यांची उंची प्रमाणापेक्षा जास्त झाल्यामुळे रस्त्यालगतची घरे व दुकाने खाली गेली आहेत. रस्त्यावरचे पाणी घरांमध्ये व दुकांनामध्ये शिरते. ग्राउंड लेव्हलच्या खाली असलेल्या दुकानांची तर पूर्ण वाताहत होते. शास्त्रीय तंत्राचा यात अभाव दिसून येतो. शहरात झालेल्या ओव्हर ब्रिजची दैन्यावस्था झाली आहे. शहरातील नेहरू पार्क चौकात, टॉवर चौकात, बस स्टॅन्ड चौकात अपघात झाले. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. ओव्हरब्रीजच्या संरक्षित भिंती कोसळून राहिल्या आहेत. त्यावर झाडे उगवत आहेत. ओव्हरब्रीजचा काही भाग बंद आहे. ओव्हर ब्रीजवरही अनेक अपघात झालेत. प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यासाठी जनजागृतीची सक्त गरज आहे. येथे आक्रोश् केल्याशिवाय पर्याय नाही. कारण खड्डे रस्त्यात की रस्ते खड्ड्यात हे समजत नाही. बस स्टॅन्ड समोरिल अन्डरग्राऊंड रस्त्याचे तर हाल कुत्रा खात नाही असे झाले आहे. आधीच उष्ण शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात सिमेंटच्या रस्त्यांनी उष्णता वाढविण्यास हातभारच लावला आहे. डांबरी रस्त्यांप्रमाणे सिमेंटच्या रस्त्यांची सहजा सहजी डागडूजी होत नाही. किती आक्रोश करावा ?
अनेक महत्वाच्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट सुरू नसतात. अंधारामुळे अपघात होतात. जनतेला खुप त्रास सहन करावा लागतो. गल्ली-बोळांमध्ये तर भयंकर चित्र आहे. तेथे तर खांबांवर लाईटच नसतात. असले तरी बंद अवस्थेत असतात. जनतेचे सेवक याबाबतीत फार उदासीन दिसून येतात. अंधाराचा फायदा घेत अनेक गैरप्रकार घडतांना दिसून येतात. चोरटयांचे तर चांगलेच फावते. केव्हा जाग येईल आमच्या प्रशासनाला ? शहराचा मोठा विस्तार झाला आहे. विस्तारीत भागात आणि जुन्या भागात पिण्याच्या पाण्याचा व्यवस्थित पुरवठा होत नाही. अनेक ठिकाणी फुटलेल्या पाईप लाईनमधुन धो-धो पाणी वाया जाते. गॅलन्स ऑफ लिटर पाण्याची नासाडी होते. अमृत जलच्या नावाखाली लोकांना अमृतासमान पाणी प्यायला भेटत नाही. काही भागात अजूनही जुन्याच पाईप लाईन मधून पाणी पुरवठा होतो. त्यातून अशुध्द पाणी मिळते. धरणामध्ये पुरेसे पाणी असूनही नियमित पाणी पुरवठा होत नाही. पाणी पुरवठयाचे काही वेळापत्रक नाही. सार्वजनिक नळांचे पाणी तोटयांअभावी वाया जाते. स्थानिक जनतेने आणि नगरसेवकांनी याबाबतीत पुढाकार घ्यावा. नळांना तोट्या बसवाव्यात. शासनाने लोकांना याबाबत जागरूक करावे. राष्ट्रीय संपत्ती जी की निसर्गाच्या भरवशावर मिळते तिचा अपव्यय भविष्याच्या दुष्टीने घातक आहे. पावसाचे पाणी जिरवण्याची आणि मुरवण्याची व्यवस्था व्हावी. यासाठी शासनाचे प्रयत्न अपुरे पडतांना दिसतात. किती म्हणून सांगावे?
शहराच्या कोणत्याही भागात फेरफटका मारला तर सर्व्हिस लाईन मधल्या नाल्या तुडुंब भरलेल्या असतात. रस्त्याने दृर्गंधी येते. पावसाळयात मोठे नाले ओव्हरफ्लो होतात. रस्त्याने गेले तर महापुरासारखी स्थिती निदर्शनास येते. रस्त्याने जाणे कठिण होते. नाल्यांमधली सगळी घाण रस्त्यावर येते. नाल्यांचे पाणी रस्त्यांवर साचते. जनता त्यामधुनच जाणे-येणे करते.
हे सर्वांच्या आरोग्याच्या दुष्टीने हितकारक नाही. पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था प्रशासनाने करावी. मात्र याबाबतीत काहीही पावले प्रशासनाने उचललेली नाहीत त्यामुळे जनतेच्या आरोग्यास हानी पोहाचते. अनेक व्हायरल डिसिजेस तोंड वर काढतात. महानगरपालिका अनेक प्रकारचे कर नागरिंकाकडून वसूल करते. मात्र शहरात दिवसेंदिवस वृक्षांची कत्तल होते आहे. वृक्ष लागवड आणि संर्वधनाच्या बाबतीत फार मोठी उदासिनता आहे. शहर हिरवेगार होण्याऐवजी भकास होते आहे. जनतेने आणि प्रशासनाने याबाबतीत सकारात्मक पाऊले टाकली नाहीत तर येणाऱ्याया पिढिला उष्णतेचे चटके ५० डिग्रीच्या वर तापमानाचे सहन करावे लागतील. ते त्यांच्या पूर्वजांना दोष देत जीवन जगतील. लोक आक्रोश करतील. समाज मन ढवळून निघेल. अकोला शहराला नको ती नावे ठेवली जात आहेत, याची दखल प्रशासनाने उदार अंतःकरणाने घ्यावी. किती म्हणून टाहो फोडावा?