नागपूर : उपराजधानी नागपुरातील एक मुस्लिम परिवार गेल्या दहा वर्षांपासून नियमितपणे घरात गणपती स्थापना करून त्याची आराधना करीत आहे. सिझेन सोहेल खान या १८ वर्षीय तरुणाचे हे कुटुंब आहे.
सिझेन बालपणापासून मित्रांकडे असलेल्या गणेशोत्सवात सहभागी व्हायचा. पाच वर्षांचा असताना त्याने घरीच गणेशाची मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने दरवर्षीच गणपतीची मूर्ती तयार करण्याचा क्रम सुरू ठेवाला. सिझेनची गणेशभक्ती पाहता खान कुटुंब तेव्हापासून मनोभावे गणपतीची सेवा करतात. सिझेनचे अम्मी व अब्बू देखील गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस गणपतीची मनोभावे सेवा करतात.
सिझेनच्या घरी दोनदा पूजा व आरती केली जाते. परिसरातील नागरिकही आवर्जून सिझेनच्या घरी दर्शनासाठी येतात. संपूर्ण खान परिवाराला गणपतीची आरती तोंडपाठ आहे. गणपतीबाप्पा सर्व जातीधर्माच्या समानतेचे प्रतिक असल्याचे सिझेनचे म्हणणे आहे.