नागपूर : शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीतामध्ये अनेक स्पर्धा जिंकत नागपूर व विदर्भात नावलौकिक प्राप्त करणाऱ्या संगीत विशारद स्व. पल्लवी बेहेरे ढेंगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘स्मृतीगंध’ या संगीत महोत्सवात सुमधुर गीतांच्या प्रस्तुतीने अक्षरशः स्मृतिगंध दरवळला.
लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक मुंबईचे अनिरुद्ध देशपांडे यांनी उत्कृष्ट शास्त्रीय गायन सादर केले. ‘मोरा जिया नही लागे , मोरे पिया परदेस’ या भावपूर्ण गीताने देशपांडे यांनी स्वर सुमनांजली दिली. पहिल्याच गीतापासून उपस्थितांनी भरभरून दाद दिली. यावेळी त्यांनी काटा रुते हे नाट्यगीत, दत्ताची पालखी हे भक्तीगीत, जांसमोहिनी देस ठुमरी ,सुरत पिया की, कानडा राजा, असे वैविध्यपूर्ण गीत प्रकार सादर केले.
तत्पूर्वी आदित्य गोगटे यांनी अनिरुद्ध देशपांडे यांचे स्वागत केले . अनिरुद्ध देशपांडे यांनी स्व. पल्लवी यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की आपण एकाच गुरू कडे स्वरसाधना केली असून ,त्या अत्यंत मनमिळाऊ होत्या आणि निष्ठवंत संगीत अभ्यासक होत्या. गीतांच्या माध्यमाने आज त्यांना स्वरांजली देत असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात सुरेश ढेंगे, न्यायमूर्ती किशोर रूही , अजय हर्डे, आशिष मोटघरे, अनुराधा पाध्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.
पल्लवी यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून गाण्याला सुरूवात केली होती. पंडित प्रभाकर देशकर व डॉ. अनुराधा पाध्ये यांच्या त्या शिष्या होत्या. अनिरुद्ध देशपांडे यांना हार्मोनियमवर श्रीकांत पिसे तर तबल्यावर निलेश खोडे यांनी साथसंगत केली. देतील. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने संगीत रसिकांची उपस्थति दिसून आली. कार्यक्रमाचे आयोजन संजय बेहेरे, विजया बेहेरे, पवन ढेंगे व श्री संगीत विद्यालयाच्यावतीने करण्यात आले. सूत्रसंचालन भार्गवी बाबरेकर यांनी केले.