अमरावती : भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव 18 ऑगस्ट 2022 रोजी साजरा होत आहे. श्रीकृष्णाने महाराष्ट्रातील एका गावातून रुख्मिणीचे हरण केले होते. हे गाव अमरावती जिल्ह्यात आहे. या गावाचे नाव आहे कौंडिण्यपूर
पुराणातील उल्लेखाप्रमाणे अमरीश ऋषीचे पुत्र कौंडिण्य या नावावरून कुंडीनपूर आणि पुढे कुंडीलपूर नगरी असे नाव पडले. हेच गाव रुख्मिणीचे माहेर. श्रीरामांची आजी, अगस्तींची पत्नी लोपामुद्रा तसेच भगीरथमाता सुकेशिनी या सर्वांचे माहेरदेखील कौंडिण्यपुरचे. नल व दमयंतीचा विवाह देखील येथेच झाला होता, असा पुराणात उल्लेख आहे. कौंडिण्यपूर येथील अंबिका मंदिरातून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले, असा उल्लेखही अनेक ठिकाणी आहे. कौंडिण्यपूर वर्धा नदीच्या काठावर वसले आहे. नाथ संप्रदायातील चौरंगी नाथाचा जन्म कौंडिण्यपूर येथेच झाला. भीष्मक राजाची सुकन्या रुक्मिणी मातेचे जन्म ठिकाणही श्रीक्षेत्र कौंडिण्यपूरच आहे.
1928 पासून कौंडिण्यपूर येथे पुरातन वस्तू संशोधन सुरू आहे. आजवर या परिसरात मिळालेल्या पुरातन वस्तू, शिल्प याद्वारे हा परिसर पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट होते. वर्धा नदीच्या काठावर विठ्ठल रुक्मिणीचे प्राचीन मंदिर आहे. भारतीय संशोधन पुरातत्व विभागाला या ठिकाणी दहा हजार वर्षांपूर्वीची विष्णूची मूर्ती सापडली. समुद्रात शेषनागावर विश्राम करीत असलेले भगवान विष्णू आणि त्यांच्या पायाशी असणारी माता लक्ष्मी, यासह काही देवतांच्या मुर्त्या देखील काळा पाषाणावर कोरण्यात आल्या आहेत. विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यालगतच विष्णूची मूर्ती देखील स्थापन करण्यात आली आहे.
पुरातत्व विभागाच्या अ रा देशपांडे यांनी या भागात उत्खनन केले. तसेच 1936 मध्ये पुरातत्त्व विभागाचे प्रमुख रायबहादूर दीक्षित यांनी देखील या परिसरात संशोधन केले. यानंतर 1962 मध्ये पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉक्टर मोरेश्वर दीक्षित यांनी या भागात उत्खनन आणि अभ्यास केला. या भागात उत्खन्नात मिळालेल्या वस्तूंवरून, या वस्तू ताम्र आणि पाषाण युगातील असाव्यात असा अंदाज लावण्यात येतो. सातवाहन काळातील काही नाणी व मातीची भांडी उत्खननात मिळाली आहेत. याच भागात टेकड्यांवर मोठ मोठ्या इमारती, महाल असल्याच्या खुणा ही आढळल्या आहेत. पाऊस पडल्यावर या परिसरात अनेक ठिकाणी पुरातन वस्तू सापडतात. या ठिकाणी आढळून आलेल्या वस्तू पुण्याच्या पुरातत्त्व विभागाकडे आहे.
तिसऱ्या ते सहाव्या शतकापर्यंत वाकाटकांची सत्ता देखील कौंडिण्यपूर् ला होती. संपन्न जीवनाचे एक नवे दर्शन या काळात विदर्भाला घडले. विदर्भाच्या ऐश्वर्याचा ओघ पुढे पैठणला गेला, असे इतिहासकार सांगतात. कौंडिण्यपूर आणि पैठण या दोन्ही महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने सांस्कृतिक राजधानी होत्या, असे देखील इतिहासकारांचे म्हणणे आहे.