Home » शेवटचा रसिक असेपर्यंत मोहम्मद रफींना मरण नाही

शेवटचा रसिक असेपर्यंत मोहम्मद रफींना मरण नाही

पद्मश्री मो. रफी सन्मान सोहळ्यात अभिनेते पिळगावकर यांचे गौरवोद्गार

by नवस्वराज
0 comment

नागपूर : सामान्य माणसाला मरण एकदा येते; मात्र आपल्या गुणांनी असामान्य काम करणाऱ्यांच्या स्मृती कायम स्मरणात राहतात. मोहम्मद रफी हे असेच असामान्य व्यक्ती. त्यामुळे कला गुणांवर प्रेम करणारा शेवटचा रसिक जोवर जीवंत आहे, तोवर मो. रफी यांना मरण नाही, असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी शनिवारी (३० जुलै) येथे काढले. निमित्त होते मो. रफी फॅन्स कल्चरल ऑर्गनायझेशन आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित पद्मश्री मो. रफी सन्मान सोहळ्याचे.

अभिनेते पिळगावकर आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (२०२१) या दोघांचा रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते पद्मश्री मो. रफी पुरस्काराने गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि रोख ५० हजार रुपये, असे या सन्मानाचे स्वरुप. सत्काराला उत्तर देताना पिळगावकर बोलत होते. व्यासपीठावर महालेखाकार प्रवीर कुमार, अभिनेते जयवंत वाडकर, वाघमारे मसाले समूहाचे संचालक प्रकाश वाघमारे, शिक्षक सहकारी बँकेचे संजय भेंडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजाभाऊ टाकसाळे, प्रगती पाटील उपस्थित होते. प्रास्ताविकातून भूमिका मांडताना मोहम्मद सलिम म्हणाले, कोरोनाच्या निर्बंधामुळे यापूर्वीचा सन्मान सोहळा घेता आला नाही. त्यामुळे दोन वर्षांचा सन्मान एकाच व्यासपीठावर होत आहे. मो. रफींसारख्या स्वच्छ, निर्मळ माणसाच्या आठवणी ताज्या रहाव्या, इतकाच त्यामागचा मुख्य हेतूआहे.

गाणाऱ्यांचे आवाज पचनी पडत नाहीत, असा आजचा काळ असल्याचे नमूद करीत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणाले, कलाप्रिय शहर म्हणून नागपूरची महाराष्ट्रात ओळख आहे. त्यामुळे पिळगावकर आणि मोहन जोशी या दोघांना मिळालेला मो. रफी हा सन्मान म्हणजे राज्यात या दोघांचे सांस्कृतिक क्षेत्रातील मोल द्विगुणीत करणारा क्षण आहे.

सत्काराला उत्तर देताना पिळगावर यांनी मो. रफी यांच्या आठवणींना उजाळा दिला. शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाहीत, असे बहुमोल क्षण आपल्याला त्यांच्या सहवासात घालविता आले. हे धन आपल्यासाठी आयुष्यात अनमोल आहे. कलाकाराचे आयुष्य हे कलेपेक्षा वेगळे असते. त्यामुळे कलावंतासोबत माणूस म्हणून स्वतःला सिद्ध करता आले पाहिजे. मो. रफी यांच्यात हा सच्चा माणूस होता. जन्माला येणारा सामान्य माणूस हा शरीराने एकदा मरतो; पण मो. रफी यांच्यासारख्या असामान्य माणसांना दोन वेळा हे भाग्य लाभते. कलेच्या बाबतीतच सांगायचे झाले तर, जोवर त्यांच्या गळ्यावर प्रेम करणारा शेवटचा रसिक जीवंत असेल, तोवर मो. रफी यांना मरण नाही, हिच खरी त्यांना सुरसुमनांजली आहे.

मोजक्या शब्दांत मनोगत मांडताना मोहन जोशी म्हणाले, मराठीच नाही तर हिंदी चित्रपटक्षेत्रात ठसा उमटविणाऱ्यांसोबत झालेल्या या सन्मानाने खरोखरच भारावून गेलो. रुपाली मोरे- कोंडेवार यांनी नेटके संचालन करीत कार्यक्रमाला सूत्रात गुंफले. त्यानंतर मो. रफी यांच्या स्मरणार्थ रिमझिमके गीत या संगीत रजनीतून मो. रफी यांनी अजरामर केलेल्या गाण्यांना उजाळा देण्यात आला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!