अकोला : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची इमारत तयार होवून चार वर्षे उलटून गेली. कोरोनाचा प्रादूर्भाव ही संपला, मात्र अद्यापही या टोलेजंग आणि अद्यायावत हॉस्पिटलची ओपीडी शिवाय इतर सुविधा सुरू करण्यात आल्या नाहीत. केवळ आश्वासनाचे ‘गाजर’ दिल्या जात असल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी पराग गवई यांनी गाजर वाटून निषेध आंदोलन केले.
विद्यमान आरोग्य मंत्री यांनीही दिलेले आश्वासन हवेतच विरले. त्यामुळे अकोल्यातील जनतेच्या आरोग्याशी महाराष्ट्र सरकारला काही घेणे देणे दिसत नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अनेक पदे रिक्त असून, ती भरण्यात आली नाही.सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसुध्दा पूर्णपणे सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे सरकारने दिलेले आश्वासन अकोलेकरांना गाजरच ठरले आहे. गंभीर आजार तसेच अपघातातील अनेक रुग्णांना पुरेश्या आरोग्य विषयी सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना नागपूर सारख्या शहरात पाठविले जाते. यामध्ये प्रवासात आणि टोलवा टोलवीत अनेकांचा दुर्देवी अंत होत असतो. या सर्व प्रकाराकडे राज्य शासन व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गाजर वाटून निषेध केला.