Akola Constituency : छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगितल्याबद्दल काँग्रेस विरुद्ध अकोला भाजपने आंदोलन केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अकोल्याचे उमेदवार अभय पाटील यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली आहे. यासोबतच नाना पटोले यांनी विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल ही भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.
अकोल्यात भाषण करताना नाना पटोले व अभय पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास सांगितला होता. या प्रकाराचा अकोल्याच्या भारतीय जनता पार्टीने व भारतीय जनता युवा मोर्चाने निषेध केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुतळा यावेळी जाळण्यात आला. पवन महल्ले, जयंत मसने, उज्ज्वल बामनेट, अभिषेक भगत, कुणाल शिंदे यांच्यासह युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.
खासदारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य
अकोला लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप खासदार संजय धोत्रे यांच्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आक्षेपार्ह विधान केले. काँग्रेसचे अकोला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अकोल्यात आले होते.
प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले यांनी खासदार संजय धोत्रे यांच्या संदर्भात आपत्तीजनक विधान केले. संजय धोत्रे हे व्हेंटिलेटरवर आहेत. निवडणूक काळात त्यांचे व्हेंटिलेटर काढल्या जाऊ शकते, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले. भाजपवर टीका करताना पटोले हे माणुसकी विसरले असा संताप व्यक्त करीत युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पटोले यांचा पुतळा जाळत, त्यांना प्रत्युत्तर दिले.
शुक्रवारी (ता.5) सायंकाळी दुर्गा चौकात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून विषारी प्रचार सुरू असताना असाच प्रकार अकोला येथे घडला आहे. अकोल्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नागरिकही नाराज झाले आहेत. मतांच्या राजकारणात नेत्यांनी माणुसकीलाही काळिमा फासल्याची टीका, सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.