Home » विदर्भातील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी हवी रेल्वेसेवा

विदर्भातील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी हवी रेल्वेसेवा

by नवस्वराज
0 comment

शेगाव : विदर्भातील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी गोंदिया-करमाळी, बल्लारशा-मडगाव, चंद्रपूर-थिवीम या स्पेशल रेल्वेगाडी दीवाळी, होळी, गणेशोत्सव काळात नियमित सुरू करण्याची मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव, रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण–सावंतवाडी यांनी केली आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, नागपूर येथील दीक्षाभूमी, वर्धा येथील सेवाग्राम आश्रम, चंद्रपूर येथील महाकाली मंदिर, शेगांव येथील संत श्री गजानन महाराज मंदिर, बुलडाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदेखेडराजा, अमरावती जिल्ह्यातील संत गाडगेबाबांचे जन्मस्थळ मोझरी, नांदुरा येथील १०५ फुटी हनुमानाची मूर्ती, मूर्तिजापूरचे कार्तिक स्वामी मंदिर येथे दर्शनासाठी कोकणातील भाविक येत असतात. विदर्भातील नागरिक मोठ्या संख्येने कोकणात निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी जातात.

गोंदिया-मडगाव, बल्लारशा-मडगावपासून करमाळी गोवा-मडगाव, गोवाकरीता नियमितपणे स्पेशल रेल्वेगाडी सुरू झाल्यास विदर्भ व कोकणातील प्रवाशांची चांगली सोय होईल. नियमित रेल्वे सेवेमुळे या दोन्ही प्रदेशातील व्यवसायांनाही चालना मिळेल. त्यातून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन रेल्वे विभागालाही महसूल प्राप्त होईल. मध्य रेल्वे प्रशासनाने या रेल्वे सेवा नियमित चालविण्यासाठी मंजुरी दिल्यास विदर्भातील शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळू शकेल. त्यामुळे मध्य रेल्वेने त्याचा विचार करावा अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटना शेगांवचे अध्यक्ष राजकुमार व्यास, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा, प्रवासी संघटना शेगांव-अखिल भारतीय ग्राहक पंचायत शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल, रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी संस्थापक अध्यक्ष सुनिल उत्तेकर राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतुले, संघटनमंत्री ओमकार माळगांवकर, संपर्क प्रमुख हर्षल भगत, चैतन्य धुरी यांनी केली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!