Special Operation : गडचिरोली पोलिस दलाने हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल महिला माओवादी व टिटोळा गावातील पोलिस पाटलाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या एका जनमिलिशीयास अटक केली आहे. काजल ऊर्फ सिंधू गावडे, (वय 28), गीता ऊर्फ सुकली कोरचा (वय 31) गडचिरोली-कांकेर (छत्तीसगड) सिमेवरील पिपली बुर्गी हद्दीतील मौजा जवेली जंगल परिसरात फिरत असताना त्यांना अटक करण्यात आली.
2020 मध्ये कोपर्शी-पोयारकोटी जंगल परिसरात पोलिस-माओवादी चकमक झाली होती. यात गडचिरोली पोलिस दलातील एक अधिकारी व एक जवान शहिद झाले होते. या चकमकीत दोघींचा प्रत्यक्ष सहभाग होता. 2023 मध्ये टिटोळा ते पामाजीगुडा जंगल परिसरात झालेल्या पोलिस पाटलाच्या हत्येप्रकरणी माओवादी जनमिलिशीया पिसा पांडू नरोटे फरार होता. पिसा गिलनगुडा जंगल परिसरात लपून बसला असल्याच्या माहितीवरून छापा घालत त्याला अटक करण्यात आली.
काजल ऊर्फ सिंधू गावडे ही दलममधे कार्यरत होती. 2012 मध्ये प्लाटुन क्रमांक 55 मध्ये सदस्य पदावर ती भरती झाली. 2019 पर्यंत ती तेथे कार्यरत होती. 2019 मध्ये कंपनी क्रमांक 04 मध्ये तिची बदली करण्यात आली. 2020 पासून तह डीव्हीसी (डिव्हीजनल कमिटी) स्टाफ टीम, प्रेस टीममध्ये सदस्य पदावर होती. सात चकमकींमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग आहे. गीता ऊर्फ सुकली कोरचा 2018 मध्ये भामरागड दलममध्ये भरती झाली. सप्टेंबर 2020 मध्ये ती माड एरीयामध्ये बदलीवर आली. तीन चकमकीत तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. तिने दोन खूनही केले आहेत. पिसा पांडू नरोटे 2018 पासून गावात राहुनच जनमिलिशीया म्हणून माओवाद्यांसाठी राशन आणून देत होता. पिसा माओवाद्यांसाठी पाहारा देखील देत होता. तीन खून प्रकरणात पिसाचा सहभाग आहे. स्फोटके पेरण्यासाठी देखील तो माओवाद्यांना मदत करीत होता.