अकोला : व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवताना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या तसेच भडकावल्या जाऊ नये, याचे भान प्रत्येकानी ठेवावे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात निर्णय देताना व्यक्त केले.
वाशिम जिल्ह्यातील मोझरी येथील किशोर लांडेकर (वय २७) याच्या विरोधात मंगरूळपीर पोलीसांनी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या कलम २९५- ए, माहिती तंत्रज्ञान व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला. तो रद्द करण्यासाठी किशोरने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अंतिम सुनावणी नंतर न्यायमूर्ती विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांनी अर्ज फेटाळला.
व्हॉट्सअॅप स्टेटस हे ओळखीच्या लोकांसोबत संवाद साधण्याचे साधन आहे, त्यामुळे स्टेटस ठेवतांना जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. व्हॉट्सअॅप स्टेटस मर्यादित लोकांपर्यंतच सिमित असते, असे म्हणून कोणीही जबाबदारी टाळू शकत नाही, अशी टिप्पणी निर्णयात केली आहे. आपण काय करतो आहे, डोक्यात कुठले विचार सुरू आहेत, काय बघितले याची माहिती देणारे व्हिडीओ वा छायाचित्रे स्टेटसवर अपलोड केली जातात, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले आहे.