Akola | अकोला : महानगरातील खासगी कोचिंग क्लासच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. प्रत्येक भागात दोन ते तीन खासगी शिकवणी वर्ग आहेत. रणपिसे नगर, शासकीय दूध डेअरीकडील मार्ग, जठारपेठ, गोरक्षण रोड याभागात संख्या अधिक आहे. पहाटे पासून उशिरा रात्रीपर्यंत हे वर्ग सुरू असतात. विद्यार्थ्यांच्या आंतरिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही शिकवणी वर्गाच्या संचालकांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवले आहेत. मात्र शिकवणी वर्गाचे रस्ते टवाळखोरांचे अड्डे झाले आहेत. (Akola Road Near Private Coaching Classes Are Stand Of Mischievous People)
असामाजिक तत्व वर्गात जाणाऱ्या विद्यार्थिनींची छेडखानी करतात. मोटरसायकलचा कट मारून सायकल व स्कूटर वरून जाणाऱ्या विद्यार्थिनींना पाडण्याचे प्रकार देखील घडतात. काही प्रकरणांची नोंद पोलिस दफ्तरी होते. परंतु अनेक विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक भीतीपोटी तक्रार देत नाही. त्यामुळे असामाजिक तत्वांची हिंमत वाढते.
पोलिस प्रशासनाच्या दामिनी पथकाने धडक मोहीम राबवून शिकवणी वर्गाच्या रस्त्यावर आणि आसपास टवाळखोरी करणाऱ्यांवर कारवाई करून छेडखानीच्या प्रकारांना आळा घालावा. शिकवणी वर्गाच्या संचालकांनी देखील नजीकच्या पोलिस स्टेशनचा तसेच दामिनी पथकाचे फोन व भ्रमणध्वनी क्रमांक शिकवणी वर्गाच्या दर्शनी भागावर लावावे, अशी मागणी होत आहे.