Nagpur : केंद्रीय अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला पूर्णत: नव्या मार्गिकांच्या कामांसाठी एकूण 1 हजार 685 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सर्वाधिक 600 कोटी रुपयांची तरतूद वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ पुसद या 270 किलोमीटर मार्गिकेसाठी आहे. तर अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ मार्गिकेसाठीही कोटी, सोलापूर-उस्मानाबाद-तुळजापूर मार्गासाठी 110 कोटी आणि धुळे-नर्दाना मार्गिका, कल्याण-मुरबाड व्हाया उल्हासनगर आणि बारामती-लोणांद मार्गासाठी प्रत्येकी 100 कोटी रुपयांची, तर फलटण-पंढरपूर या 105 किलोमीटर मार्गिकेच्या बांधकामासाठीही 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
अजनी सॅटेलाईट स्टेशनसाठी 7.5 कोटी मिळाले आहे. अजनी रेल्वे स्थानकाला सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विकास केला जात आहे. आतापर्यंत 45.33 कोटींच्या खर्चाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. आता पुन्हा 7.5 कोटी दिले जाणार आहेत. येथे चार नवीन प्लॅटफॉर्म विकसित केले जाणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या अतिरिक्त मार्गिकांच्या कामांसाठी एकूण 2 हजार 702 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. यापैकी कल्याण – कसारा तिसऱ्या मार्गिकेसाठी 90 कोटी, पुणे – मिरज – लोंडा दोन मार्गिकांसाठी 900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर वर्धा – नागूपर तिसरा मार्ग, वर्धा – बल्लारशहा तिसरा मार्ग, इटारसी – नागपूर, दौंड – मनमाड दोन मार्गिका, वर्धा – नागपूर चौथी मार्गिका, मनमानड – जळगाव तिसरा आणि जळगाव – भुसावळ चौथ्या मार्गिकेच्या कामांसाठीही निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.