Home » MPDA Action : अकोल्यातील कुख्यात गुंड स्थानबध्द

MPDA Action : अकोल्यातील कुख्यात गुंड स्थानबध्द

IPS Bachachan Sing : विनायक महेंद्र येन्नेवारला केले जेलबंद

by नवस्वराज
0 comment

भूषण इंदोरिया | Bhushan Indoriya

Akola Police : डाबकी रोडवरील सोपीनाथ नगर कॅनॉल रोड अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड विनायक महेंद्र येन्नेवार (वय 24) याला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

विनायकविरुद्ध यापूर्वी जबरी चोरी करताना दुखापत करणे, जबरी चोरीसाठी अपहरण, जीवे मारण्याची धमकी, दुखापत, बेकायदेशीर शस्त्र, घरात घुसून खंडणी मागत नुकसान करणे, अश्लील शिवीगाळ, सार्वजनिक ठिकाणी मारहाण, दरोड्याचा प्रयत्न, बंद मालमत्तेतून चोरी असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

विनायक कोणत्याही कारवाईला जुमानत नसल्याने त्याच्या विरुद्ध गंभीर दखल घेण्यात आली आहे. विनायक महेंद्र येन्नेवार याच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हा आदेश दिला. सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून कुंभार यांनी हे आदेश दिलेत. त्यामुळे विनायकला जेलबंद करण्यात आले आहे.

बुधवारी (ता. सात) विनायक महेंद्र येन्नेवार, याला अकोला जिल्हा कारागृहात बंद करण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, शहराचे उपअधीक्षक सतीश कुळकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे, हेडकॉंस्टेबल ज्ञानेश्वर सैरीसे, कॉंस्टेबल उदय शुक्ला, डाबकी रोड पोलिस स्टेशनचे निरीक्षक किशोर जुनघरे, हेडकॉंस्टेबल उमेश पाटील, प्रविण इंगळे, कॉंस्टेबल उमेश सुगंधी यांनी हा प्रस्ताव तयार केला.

अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व शांतता राहावी यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या व कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत व्यक्तींवर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने व आगामी उत्सवांच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे. जिल्हाभरातील माहिती त्यासाठी गोळा केली जात आहे. अनेक गुन्हेगारांवर आता पोलिस एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!