अकोला : मुंबईतील शहरातील एका बांधकाम व्यवसायिकाकडे गेल्या १७ वर्षांपासून काम करणाऱ्या गाडी चालकाने १ कोटी रुपये घेऊन धूम ठोकली. पोलिसांनी या व्यक्तीला मंगळवारी अकोला जिल्ह्यातून अटक केली. संतोष चव्हाण असे आरोपीचं नाव असून गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांत त्याला पकडण्यात आले.
पोलिसांनी आरोपी चव्हाणकडून ३६ लाख रुपये आणि चोरीची कार जप्त केली आहे. आरोपी चव्हाण हा बांधकाम व्यवसायिक धीरेंद्र अमितलाल शेठ यांच्याकडे गेल्या १७ वर्षांपासून काम करत होता. गेल्या आठवड्यात तो मालकासोबत जोगेश्वरी येथील उपनिबंधक कार्यालयात गेला. त्यावेळी, फिर्यादी मालकाने आरोपीं चव्हाण यास २५ लाख रुपये देऊन गाडीत बसण्यास सांगितले होते. मात्र, धीरेंद्र हे निबंधक कार्यालयातून परतल्यावर त्यांची गाडी आणि चालक चव्हाण दोघेही न सापडल्याने शेठ यांना धक्का बसला.
पोलीस तपासादरम्यान चव्हाण पत्नी आणि मुलांसह अकोल्यात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर, पोलिसांचे विशेष पथक अकोल्याला रवाना करण्यात आले, अकोला पोलिसांच्या मदतीने आरोपी चव्हाणला पकडण्यात यश आले.