Home » पावसाने नदीनाल्यांना पूर: एक व्यक्ती वाहून गेली

पावसाने नदीनाल्यांना पूर: एक व्यक्ती वाहून गेली

by नवस्वराज
0 comment

अकोला : जिल्ह्यात गत २४ तासांत सरासरी ३७.९ मिमी पाऊस झाला. नदीनाल्यांना पूर आल्याने काही रस्ते बंद झाले आहेत. पुरात एक व्यक्ती वाहून गेली असून, शोधकार्य सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून मदतकार्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व सर्व पथके सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, आवश्यकता पडल्यास अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध असावे म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडेही (एनडीआरएफ) पथकाची मागणी करण्यात आली. त्यानुसार एक पथक सायंकाळी दाखल होईल.

तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील नदीला पूर येऊन अंकित ठाकूर (वय 28) हा युवक वाहून गेला. त्याबाबत शोधकार्य सुरू आहे. मोर्णा नदीला पूर आला असून आगर ते उगवा रस्ता बंद आहे. नाल्याला पूर आल्याने अकोट-वणी वारुळा-मुंडगाव रस्ता बंद आहे. तेल्हारा तालुक्यात अतिवृष्टी होऊन, विद्रुपा नदी व नाल्याला पूर आल्याने मनब्दा ते भांबेरी रस्ता बंद आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील ब्रम्ही खुर्द ते शेलू बाजार रस्ता नदीला पूर आल्याने बंद आहे. कमळणी नदीला पूर आल्याने कमळखेड- निंबा-धानोरा पाटेकरकडे जाणारा रस्ता बंद आहे. जिल्ह्यात आज दुपारपर्यंत प्राप्त माहितीनुसार 145 घरांचे अंशत: नुकसान झाले. रात्रीपासून पाऊस सतत सुरू आहे. पाऊस थांबताच शेती व पशुधन नुकसानीचे प्राथमिक अहवाल पूर्ण करण्यात येणार आहेत, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी गावात विद्रुपा नदीला आलेल्या पुरामुळे पाथर्डी येथील राजू देठे व श्री. साबळे असे दोघेजण शेतात अडकले होते. जिल्हा शोध व बचाव पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढले. तेल्हारा तालुक्यातील अदमपूर येथील मुरलीधर वाघ हे नाल्याला पूर आल्याने शेतात अडकले होते. त्यांना बचाव पथकाने पूरस्थितीतून बाहेर काढले. बाळापूर शहराजवळील भिकुंड बंधा-याजवळ पूरस्थितीने अडकून पडलेल्या अब्दुल साबिर अब्दुल रसूल व गुलाम जफर शेख हसन या दोन व्यक्तींना बचाव पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढले. जिल्हाधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी शरद जावळे यांच्याकडून परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. जिल्हा शोध व पथकाचे श्री. साबळे, सुनील कल्ले, हरिहर निमंकडे, कुरणखेड येथील वंदे मातरम पथक, पिंजर येथील संत गाडगेबाबा पथक यांच्यासह अनेक कर्मचारी व स्वयंसेवक मदतकार्यासाठी सुसज्ज आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!