BJP Politics : अकोला लोकसभा मतदारसंघात आता भाजपचा रस्ता सोपा होताना दिसत आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार तथा माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यासोबतच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे एकत्रीकरण न झाल्याने अभय पाटील व प्रकाश आंबेडकर यांचे अर्ज कायम आहेत. त्यामुळे आता अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 08) तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपत असताना भाजपचे बंडखोर माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपकडून त्यांची मनधरणी करण्याला यश आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गव्हाणकर यांना कॉल करून अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केला. अकोल्यात 17 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. यात महायुती व महाविकास आघाडीतील नाराजांचेही उमेदवारी अर्ज होते. अकोल्यात भाजपचे बंडखोर उमेदवार माजी आमदार नारायण गव्हाणकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोबाइलवर संपर्क साधून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गव्हाणकर यांनी उमेदवारी मागे घेतला आहे.
चुरसपूर्ण लढत
अकोला लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे. भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात कायम आहेत. काँग्रेसचे अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या मैदानात कायम असल्याने त्याचा फायदा भाजपला मिळणार आहे. याशिवाय भाजपधील बंडखोरीही शांत झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने आता अकोला लोकसभा मतदारसंघातील चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. अकोल्यात आता भाजपचा प्रचार जोर धरणार आहे. लवकरच भाजपच्या स्टार प्रचारकांच्या अकोल्यात सभा आयोजित होणार आहेत.
दिलजमाई झालीच नाही
भाजपच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे अकोल्यात एकत्रीकरण व्हावे, यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते. मात्र काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची दिलजमाई होऊ शकली नाही. त्यामुळे आता अकोला लोकसभा मतदारसंघात मतांची विभाजन निश्चित मानले जात आहे. मतांच्या या विभाजनाचा भाजपला थेट फायदा होईल, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
धाकधूक संपली
अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारांची धाकधूक वाढली होती. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे एकत्रीकरण होऊ नये, याची धास्ती भाजपला होती. याशिवाय माझी आमदार नारायण गव्हाणकर यांच्या बंडखोरीची चिंता ही भाजपला सतावत होती. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे एकत्रीकरण झाल्यास कोणाला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागेल याची चिंता प्रकाश आंबेडकर आणि अभय पाटील दोघांनाही होती. आता संपूर्ण चित्र सुस्पष्ट झाल्यामुळे तीनही उमेदवार जोमाने प्रचाराला लागणार आहेत.