MPDA Action : यवतमाळ शहर व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराविरूद्ध एमपीडीएच्या (MPDA) प्रस्तावाचा आदेश पारित झाला आहे. या गुन्हेगाराची रवानगी अकोला कारागृहात करण्यात आली आहे. वृषभ उर्फ वृषिकेश उर्फ जब्बा उमेश वानखडे (वय 24 रा. रामकृष्णनगर, मुलकी यवतमाळ) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Yavatmal Hardcore Criminal Send to Akola Jail under MPDA Law)
जब्बाचा गुन्हेगारी आलेख 2018 पासूनचा आहे. त्याच्याविरूद्ध जबरी चोरी, जखमी करणे, जीवाने मारण्याची धमकी देणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, संपत्तीचे नुकसान करणे, घातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे असे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे आहेत. यवतमाळ येथील अवधूतवाडी पोलिस ठाण्यात नोंद आहेत. यवतमाळ व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्यामुळे अवधूतवाडी पोलिसांनी एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांमार्फत जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सादर केला होता. त्या अनुषंगाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी प्रस्तावाला मंजुरी देत गुरूवार (ता 11) स्थानबद्धतेचा आदेश काढला. जब्बाला आता अकोला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या कारवाईमुळे गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.