Home » यवतमाळ : ‘शासन आपल्या दारी’ पोस्टरवर काळं फासलं

यवतमाळ : ‘शासन आपल्या दारी’ पोस्टरवर काळं फासलं

by नवस्वराज
0 comment

यवतमाळ : यवतमाळमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या पोस्टरवर अज्ञातांनी काळं फासलं आहे. यवतमाळमधील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. राज्यात मराठा आरक्षणावर वातावरण तापलेलं असताना हा कार्यक्रम होत असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

पोस्टरवर मुख्यमंत्र्यांसह शासनातील बड्या नेत्यांचेही फोटो आहेत. पोस्टरला काळं फासल्याची माहिती मिळताच हे पोस्टर हटवण्यात आलं आहे. हे काळं कोणी फासलं हे अद्याप समोर आलेलं नाही. मराठा आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने आंदोलन तीव्र केलं आहे. अशा वातावरणात यवतमाळमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यादरम्यान, मराठा आंदोलकांडून मोठा विरोध होण्याची शक्यता आहे.

किन्ही या गावात होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर मराठा आंदोलनाचे तीव्र सावट दिसत आहे. पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून आर्णी मार्गावरील सर्व पानटपऱ्या, फेरीवाल्यांना दुपारी ३ वाजेपर्यंत दुकान उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळ नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने आज या महामार्गावरील जड वाहतुकीसह प्रवासी वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!