अमरावती : आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्यातील राजकीय वैर निवडणुकीपूर्वी वाढले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांच्या भूमिपूजनाला देखील बोलावले जात नसल्याचे सांगून हिवाळी अधिवेशनात सरकारच्या विरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचा इशारा देत यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली. विकास कामांच्या भूमिपूजन, उद्घाटनाच्या कार्यक्रमांना स्थानिक आमदारांना निमंत्रित करण्याचा प्रघात आहे. मात्र, खासदार नवनीत राणा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे राजकीय सूडबुद्धीने वागत असून स्थानिक आमदारांना डावलत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.
यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांची ओळख जिल्ह्यातील आक्रमक नेत्या अशी आहे. वर्चस्वाच्या लढाईतून त्यांच्यात संघर्ष सुरू झाला. यशोमती ठाकूर या तिवसा मतदार संघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाची देखील संधी मिळाली होती.
२०१९ च्या निवडणुकीच्या वेळी नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून लढतीत होत्या. प्रचारादरम्यान काँग्रेसच्या नेत्यांना नवनीत राणांच्या भूमिकेविषयी संशय वाटायला लागला होता. प्रचारादरम्यान नवनीत राणा यांच्याकडून काँग्रेस आघाडीशी प्रामाणिक राहील, अशी शपथ घेण्यास यशोमती ठाकूर यांनी भाग पाडले होते. पण निकालानंतर लगेच नवनीत राणा यांनी केंद्रातील भाजप सरकारला पाठिंबा देऊन आपली दिशा स्पष्ट केली.