अकोला : अकोला ते गायगाव मार्गावर असलेल्या डाबकी रोड रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाच्या कामाला वेग देण्यात आला आहे. या मार्गावर असलेल्या डाबकी रोड रेल्वे क्रॉसिंगवर वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने येथे उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु हे काम मध्यंतरीच्या काळात रखडले होते.
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर डाबकी रोड रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाच्या कामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. प्रसार माध्यमांनीही याकडे लक्षवेध केल्याने लोकप्रतिनिधी कामाला लागले. त्यानंतर तातडीने रेल्वे प्रशासनाने काम हाती घेतले. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील अभियंत्यांनी मंगळवार, २० डिसेंबर २०२२ पासून उड्डाणपुलाच्या गर्डरचे काम हाती घेतले आहे. २२ डिसेंबर २०२२ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तीन दिवसात गर्डरचे काम पूर्ण करायचे असल्याने रेल्वे फाटकावरील वाहतूक सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत बंद ठेवण्यात येत आहे.