अकोला : महावितरण कंपनीचा कारभार ढेपाळला असून मिटर वाचन, वारंवार वीज पुरवठा खंडीत होणे, चुकीची वीज देयके प्राप्त होणे अशा अनेक तक्रारींचा ओघ वाढला आहे. ग्राहकांचा रोष कमी व्हावा या दृष्टिकोनातून अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी ग्राहकांना दर्जेदार आणि तत्पर सेवा पुरविण्याचा संकल्प जाहीर केले आहे. त्यांचे मार्गदर्शनाखाली अकोला शहर विभागापासून संकल्पाचा शुभारंभ झाला.
पवनकुमार कछोट अधीक्षक अभियंता, जयंत पैकिने कार्यकारी अभियंता शहर विभाग अकोला यांनी संकल्प पूर्तीसाठी पुढाकार घेतला. शहर उपविभाग १ अंतर्गत येणाऱ्या तक्रार निवारण केंद्र ९ मधील अर्जुन बजाज यांनी ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.२७ वाजता नवीन वीज पुरवठा मिळण्यासाठी अर्ज सादर केला. दुपारी १२.०८ वाजता सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून दुपारी १.०० वाजता बजाज यांना मागणी केलेल्या स्थळावर अवघ्या २ तासात विद्युत मिटर बसवून दिले.
उपविभाग एकचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुशील जयस्वाल तक्रार निवारण केंद्र नऊचे सहाय्यक अभियंता फय्याज पाटा यांचे देखरेखीत जनमित्र विवेक चोडके व वैभव तायडे यांनी अर्जुन बजाज यांचेकडे वीज मिटर बसवले. महावितरण कंपनीच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. मात्र संकल्प अखंडपणे सुरू रहावा, वीज ग्राहकांना कायम दर्जेदार आणि तत्पर सेवा मिळावी अशी आशा ग्राहकांनी व्यक्त केली आहे.