Akola : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्रात दौरा होत आहे. महाराष्ट्रातील अकोला येथे अमित शाह यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी अकोल्यातील भाजपचे नेते व कार्यकर्त्यां तर्फे करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक जवळ आल्याने राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला असून मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संभाजीनगर येथे होणाऱ्या सभेसाठी लावण्यात आलेले बॅनर मराठा समाजाच्या आंदोलकांनी फाडले आहेत. दुसरीकडे अकोल्यातील हॉटेल जलसा येथे मंगळवारी (ता. 5) अमित शाह यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. अमित शाह हे अकोल्यातील हॉटेल जलसा येथे क्लस्टरची बैठक घेत आहेत. अमित शाह यांच्या या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित होणार आहेत. विदर्भातील सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतील. अकोल्यातील शिवणी विमानतळापासून ते रिधोरा येथील हॉटेल जलसापर्यंत भाजप नेते अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांच्या स्वागताचे बॅनर भाजपाकडून लावण्यात आले आहेत.
भाजपच्यावतीने अमित शाह यांच्या स्वागतासाठी रिधोरा गावाजवळ असलेल्या हॉटेल जलसा येथे बॅनर लावण्यात आले होते. रिधोरा गावाजवळ असलेल्या हॉटेल जलसा मार्गावर लावण्यात आलेले अमित शाह यांच्या स्वागताचे बॅनर काही अज्ञातांनी फाडले आहेत. अमित शाह यांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याने नवा वाद निर्माण होणार आहे. अकोल्यात नेमके कुणी आणि का बॅनर फाडले, याची माहिती, कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
पोलिसांचा बंदोबस्त!
अमित शाह यांना झेड प्लस सुरक्षा असल्यामुळे पोलिस शाह यांच्या दौऱ्यावर विशेष लक्ष ठेऊन आहेत. शिवणी विमानतळापासून हॉटेल जलसापर्यंत पोलिसांनी तगडा बंदोबस्त लागला आहे. अमित शाह यांच्यासह राज्यातील भाजपचे महत्वाचे नेतेही येत असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे. रिधोरा गावाजवळील हॉटेल जलसा जवळही पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. बॅनर फाडल्याच्या प्रकारानंतर पोलिसांतर्फे अज्ञाताचा शोध घेणे सुरू आहे.