अकोला : अशोक वाटिका चौकात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपूलाच्या लॅडिंग खाली फुटलेली ६०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण झाले आहे. परिणामी महान येथील २५ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून दहा दिवसानंतर पाण्याचे पंपिंग सुरू करण्यात आले आहे.
अकोल्यात गुरुवारी विविध जलकुंभातून अनेक भागांना पाणीपुरवठा होईल. ६०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी लॅडिंग खाली फुटल्याने ती दुरुस्त करता आली नाही. त्यामुळे जलवाहिनी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने आता अकोला शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.
शिवसेनेकडून निवेदन
अकोल्यातील पाणीपुरवठा खंडित झाल्याने गेले दोन आठवड्यापासून नागरिकांचे हाल होत होते. या संदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला महापालिकेच्या उपायुक्तांना निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.