अकोला : नवरात्र उत्सव सुरू असून दसरा तोंडावर आहे. महानगरपालिका आरोग्य विभाग मात्र उदासीन आहे. त्यामुळे नागरीकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
महानगरातील प्रभाग क्रमांक १२ मधील राधाकिसन प्लाॅट, सरकारी बगीचा, खोलेश्वर भागात रस्ते व सांडपाण्याच्या नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नुकताच स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात आला हे विशेष. अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला असून तातडीने कीटकनाशक तसेच धुर फवारणी करणे आवश्यक आहे. कुत्रे, डुकरं आदी मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. महानगरातील डुकरांमध्ये ‘आफ्रिकन स्वाईन फिवर’, रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्याने, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. महानगरपालिका आरोग्य विभागाने याकडे विशेष लक्ष घालून ऐन सणासुदीचे दरम्यान नागरीकांना होत असलेला त्रास दूर करावा, अशी या प्रभागातील त्रस्त नागरीकांची मागणी आहे.