मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते व अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महत्वाची टिप्पणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तरी त्यांना आजच्या क्षणी मुख्यमंत्री पदावर पुन्हा बसविता येणे अवघड ठरले असते, असे मत अॅड. आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
अॅड. आंबेडकर यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केले. आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी आततायीपणाने निर्णय घेण्यात आला. त्याचा हा परिणाम आहे. उद्धव ठाकरे माहिती देण्यात कमी पडले. भाजपने राज्यपालांमार्फत तानाशाही केली आहे. विधानसभेत अविश्वासाचा ठराव आणला नाही असेही अॅड. आंबेडकर यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न देता फ्लोअर टेस्टला सामोरे गेले असते तर पुन्हा सरकार आणता आले असते अशाप्रकारे महत्वाचे निरीक्षणही सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. यावर बोलताना अॅड. आंबेडकर म्हणाले, तसे झाले नसते. कोर्टाला स्वतःहुन कायदे तयार करण्याचा अधिकार नाही. अस्तित्वात असलेले कायदे कोर्ट फक्त लागू करू शकतात. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करावे लागेल अशी स्पष्ट भूमिका अॅड. आंबेडकर यांनी मांडली.
महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि भाजपाचे सरकार घटनाबाह्य आहे हे स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपामधुन बाहेर पडावे. त्यांनी घटनाबाह्य सरकार आणले आहे, अशी टीका अॅड. आंबेडकरांनी भाजपावर केली आहे. एकनाथ शिंदे काय करतील हा त्यांचा निर्णय आहे. भाजपा काय करते हा निर्णय शिवसेनेच्या बाजुने लागला आहे, असे अॅड. आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केले.
पवारांनीही म्हटले, घाई केली!
शरद पवार यांच्या मते उद्धव ठाकरे यांनी राजीनामा न देता संघर्ष करायला हवा होता, असे ठामपणे नमूद केले आहे. ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. पत्रकारांनी पवार यांनी सत्तासंघर्षावर प्रश्न विचारले. त्यावेळी पवार म्हणाले ‘मी यापूर्वी माझ्या पुस्तकात सर्व काही मांडले आहे. आता त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही.’ शरद पवार यांच्या पुस्तकात उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत मत व्यक्त करण्यात आले आहे. ते असे आहे, ‘राज्याच्या प्रमुखाला राज्यातील घडामोडींची बित्तंबातमी आवश्यक असते. उद्या काय होऊ शकते याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी. त्यानुसार आजच काय पावले उचलायला पाहिजेत याचे राजकीय चातुर्य आवश्यक असते. याचा आभाव उद्धव ठाकरे यांच्यात जाणवला. शिवसेनेतील बंडाळीनंतर निर्माण झालेल्या पेचप्रसंगाला त्यांनी सामोरे जायला हवे होते. मात्र त्यांनी तात्काळ राजीनामा दिला अन् सरकार कोसळले.’
अॅड. निकमही म्हणाले राजीनामा नको होता
नागपुरात पत्रकारांशी बोलताना ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनीही उद्धव ठाकरे यांनी घाईत राजीनामा दिल्याचे नमूद केले. अॅड. निकम म्हणाले, महाराष्ट्रात सुरू असलेला सत्तासंघर्ष समाप्त होईल असे वाटले होते. परंतु सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय सोपविला आहे. या निर्णयाने शिंदे गटाच्या १६ आमदार अपात्र ठरतील की नाही, हे बघावे लागेल. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचित ही परिस्थिती निर्माण झाली नसती. ठाकरे यांनी अविश्वास ठराव येऊ द्यायला हवा होता. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टात सर्व काही स्पष्ट झाले असते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे वर्तमान एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारला कोणताही धोका दिसत नाही.