अकोला : कामगार कल्याण मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुणवंत कामगार पुरस्काराच्या नावामध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळे कामगारांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे नाव विश्वकर्मा आदर्श कामगार पुरस्कार असे करण्यात आले आहे.
नोकरी करत असतानाच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळातर्फे १९७९ पासून गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देऊन गौरविले जात आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत असलेल्या आणि आस्थापनेत कमीत कमी पाच वर्षे सेवा झालेल्या ५१ कामगारांना दरवर्षी हा पुरस्कार देऊन गौरविले जाते. रुपये २५ हजार, मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्यानंतर पुढील किमान १० वर्षे विविध क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या एका कामगाराची दरवर्षी कामगार भूषण पुरस्कारासाठी निवड केली जाते. रुपये ५० हजार, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
आतापर्यंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अशा पद्धतीने गुणवंत कामगार पुरस्कार देण्यात येत होता. मात्र यापुढे हा पुरस्कार विश्वकर्मा आदर्श कामगार पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे.