अकोला : आपले हक्काचे घर असावे हि प्रत्येक व्यक्तीची ईच्छा असते. मात्र बांधकाम करतांना येणारे अनुभव मोठे विचित्र असतात. नगररचना विभागाकडून घर बांधकामाचा नकाशा मंजूर करून घेणे अत्यंत जिकिरीचे काम आहे. घर, रहिवासी, व्यवसायिक संकुलाचे बांधकाम करतांना चौतर्फा किती जागा मोकळी सोडायची, नियमान्वये किती व कसे बांधकाम करायचे याबाबतचे, व अन्य नियम प्रत्येकासाठी वेगवेगळे आणि किचकट आहेत. बांधकामाचे साहित्य रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी ठेवता येत नाही. बांधकाम थोडे मागेपुढे झाले, बांधकाम साहित्य ठेवतांना अनावधानाने थोडा निष्काळजीपणा झाला, तर प्रशासन ताबडतोब कारवाईचा बडगा उगारते. मात्र सर्व नियम छोटेखानी वास्तू बांधणार्यांसाठीच आहेत.
महानगरातील अनेक भागात मोठमोठ्या रहिवासी तसेच व्यवसायिक संकुलांचे बांधकाम पुर्ण झालेले आहे वा सुरू आहे, काही बांधकाम तर अगदी प्रमुख रस्त्या लगत आहेत. यांना बांधकामाचे तसेच अन्य कुठलेही नियम लागू होत नसावेत, वा विशेष सूट देण्यात आली असावी, असे वाटते. कारण बर्याच निर्माणाधीन तसेच बांधकाम पुर्ण झालेल्या संकुलात नियमानुसार चौतर्फा जागा सोडलेली नाही, काहींनी सर्व्हिस गल्लीच हडप केली आहे तर काहीनी ग्यालरी ३-४ फुट शासनाच्या जागेत बाहेर घेतल्या आहेत. काही संकुलात पार्किंग साठी व्यवस्थाच केलेली नाही. बांधकामाचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे दिसून येते. सामान्य नागरिकांनी बांधकामाच्या नियमांचे पालन करावे अशी महानगरपालिका प्रशासनाची अपेक्षा असते,मात्र खुद्द महानगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्त्या लगत बांधलेल्या व्यवसायिक संकुलात देखील वाहनतळाची व्यवस्था केलेली नाही. बांधकामाचे नियम आणि कायदे सर्वांसाठी सारखे असावे अशी सामान्य नागरीकांची अपेक्षा आहे.