Nagpur | नागपूर : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा (Shivsena MLA Disqualification Case) निकाल 10 जानेवारी 2024 रोजी लागेल. त्या निकालाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. राजकीय वर्तुळामध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. नागपूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे नागपूर येथे आले. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
वाडेट्टीवार म्हणाले की, 10 जानेवारीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलेल. अनेक जण या पदासाठी इच्छुक असून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार बसले आहेत. अनेकांनी तर कपडे शिवून ठेवले आहेत. नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या बोहल्यावर बसेल असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. (Vijay Wadettiwar Said That Chief Minister Of State Will Be Changed After 10 Jan 2024)
नागपूर मध्ये साजरा होत असलेला काँग्रेसचा स्थापना दिवस सगळ्यांच्या लक्षात राहील. आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत. काँग्रेस आणि इंडिया आघाडी जोरदार तयारी करत आहे. महाविकास आघाडी अधिक जास्त मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार बच्चू कडू यांची अमरावतीमध्ये चर्चा झाली. एकनाथ शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. ते नसतील तर वेगळा निर्णय घेण्याबद्दल बघू, असे आमदार कडू म्हणाले. बच्चू कडूंनी निर्णय घ्यावा त्यांचे स्वागत आहे असे वडेट्टीवारांनी सांगितले. दिल्लीत महाराष्ट्र राज्याची बैठक आहे. आमच्या सर्वेक्षणात असे दिसते की लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही 30 पेक्षा जास्त जागा जिंकू. विदर्भातील 10 पैकी 07 जागांवर विजय मिळवू, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.