Mumbai : रेडिओ सिलोन वरिल बिनाका गीतमाला या कार्यक्रमा मुळे जगभरात प्रसिद्ध झालेले निवेदक अमीन सयानी यांचे 20 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ते 91 वर्षाचे होते. त्यांचा मुलगा राजिल सयानी यानी प्रसारमाध्यमांशी बोलतांना वडीलांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याचे राजिल यांनी सांगितले. अमीन सयानी यांना उच्च रक्तदाब आणि वयाशी संबंधित इतर आजार होते. 12 वर्षांपासून त्यांना पाठदुखीचा त्रास असल्याकारणामुळे वॉकरचा उपयोग करावा लागत होता.
रेडिओ सिलोन आणि विविध भारतीवर 42 वर्ष चाललेला कार्यक्रम बिनाका गीतमालाने यशाचे सर्व विक्रम मोडीत काढले. अमीन सयानी यांच्या आवाजाने लोकांवर जादू केली होती. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी लोक आतूर असायचे. अमीन सयानी केवळ 11 वर्षाचे असतांना त्यांना त्यांचे बंधू हमीद सयानी यांनी ‘ऑल इंडिया रेडिओ’ मध्ये कामाला लावलं होते. अमीन यांना गायक व्हायाचे होते.
‘बहनों और भाइयों’ असे म्हणत संबोधित करण्याची त्यांची शैली आणि लकब त्याकाळात खूप प्रसिद्ध झाली. महाभारत या गाजलेल्या टीव्ही मालिकेतील ‘मै समय हूँ’ हा अमीन सयानी यांचा आवाज अजरामर झाला आहे. 54 हजारांपेक्षा जास्त रेडिओ कार्यक्रमांची निर्मिती, कम्पेअर आणि व्हॉईसओव्हर करण्याचा विक्रम अमिन सयानी यांच्या नावावर आहे. त्यांनी 19 हजार जिंगल्सना आवाज दिला आहे. यासाठी त्यांच्या नावाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. भूत बंगला, तीन देवियाँ, कत्ल या चित्रपटांमध्ये अमीन सयानी यांनी निवेदक म्हणून काम पण केलं आहे. त्यांचा ‘एस कुमार्स का फिल्मी मुकादमा’ हा कार्यक्रम त्याकाळी अतिशय खूप लोकप्रिय झाला होता.