अकोला : पर्यावरण संवर्धन व संगोपनासाठी देशभरात व्यापक मोहिम सुरू झाली आहे. जागतिक तापमान वाढीमुळे अनेक देशांसमोर मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. वातावरणातील बदलांमुळे भारताशेजारी असलेल्या चीनमध्ये ऑगस्ट महिन्यात दुष्काळ पडला आहे. अशात अकोल्यातील एक संस्था पर्यावरण संवर्धनासाठी झटत आहे. ‘वसुंधरा केअर फाऊंडेशन’ असे या संस्थेचे नाव.
वसुंधरा केअर फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणविषयक अनेक उपक्रम राबविण्यात येतात. अलीकडेच गांधीग्राम येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा परिसर हिरवागार करण्याचा संकल्प करीत या भागात प्राणवायूचे उत्सर्जन करणारी रोपटी लावण्यात आली. ‘वसुंधरा’चे डॉ. योगेश पालीवाल, डॉ. महेश डाबरे, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य विलास झामरे, सरपंच सुषमा ठाकरे, डॉ. डी. टी. देशमुख यावेळी उपस्थित होते.
‘प्लास्टिक मुक्त’ अभियानाची कास यावेळी धरण्यात आली. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक पिशव्यांना नकार देणे किती गरजेचे आहे, हे डॉ. पालीवाल यांनी सांगितले. ‘प्लास्टिक बँक’ काळाची गरज बनल्याचे ते म्हणाले. डॉ. डाबरे यांनी महात्मा गांधी यांचे विचार व पर्यावरण संवर्धन यांचा एकमेकांशी असलेला संबंध विशद केला. डॉ. देशमुख यांनी प्रत्येकाने ‘सीड बँक’ तयार करावी असे आवाहन केले. खाल्लेल्या फळांच्या बिया कचऱ्यात न फेकता स्वच्छ करून वाळवून त्यातून रोप तयार करण्याचा सल्ला त्यांनी दिला. प्राचार्य झामरे यांनी प्रत्येक शैक्षणिक संस्थेचा परिसर हिरवागार रहवा, अशी भूमिका मांडली. सरपंच ठाकरे यांनी ग्रांधीग्राममध्ये सुरू असलेल्या पर्यावरणविषयक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाला पर्यवेक्षक गजानन राणे, ग्रंथपाल संजय इंगळे, माजी सरपंच शरद ठाकरे, अतुल काठोळे, संजय माजरे, संदीप ओहेकर, नारायण बावणे, गणेश कूले आदी उपस्थित होते.