अकोला : पांढरे सोने म्हणून ओळखला जाणारा कापूस मातीमोल भावाने खरेदी केली जात आहे. कापसाला प्रती क्विंटल दहा हजारांपेक्षा जास्त भाव द्या, यामागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी दुपारी निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
कापूस हा शेतकऱ्यांच्या घरात येण्यापूर्वी प्रती क्विंटल १४ ते १६ हजार रूपये प्रमाणे भाव होता. मात्र भाव शेतकऱ्यांच्या घरात कापूस आल्यावर गडगडून ७ हजारांवर आला आहे. आधीच अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत असून, त्यातच उत्पादन कमी झाल्यामुळे शेतीसाठी लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. परिणामी शेतकरी निराश झाला आहे. त्यामुळे शेतमालाला याेग्य भाव देण्यात यावा, असे ‘वंचित’चे म्हणणे आहे.
‘वंचित’तर्फे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. मुख्यमंत्र्याच्या नावे निवेदन देण्यात आले. यावेळी महासचिव मिलिंद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा सिरसाट जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, सभापती योगीता रोकडे, आम्रपाली खंडारे, रिजवाना परवीन शेख मुक्तार, माया संजय नाईक, पुष्पा इंगळे, शोभा शेळके, गट नेते ज्ञानेश्वर सुलताने , गजानन गवई , प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, किशोर जामनिक, दिनकर खंडारे, शरद इंगोले, मंगला सिरसाट, निता गवई, प्रमोदिनी कोल्हे, डॉ. नीलेश उन्हाळे, संजय बावणे, बबलु सिरसाट, सचिन शिराळे आदी उपस्थित होते.