Mumbai : महाविकास आघाडी जोमाने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. आघाडीचे नेते राज्यातील भाजपविरोधी पक्ष आणि नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. एक महिन्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला आहे. परंतु महाविकास आघाडीमधील प्रमुख चारही पक्षांमध्ये योग्य ताळमेळ असल्याचे दिसून येते नाही. वंचित बहुजन आघाडीतर्फे सातत्याने वेगवेगळ्या अटी-शर्ती व मागण्या पुढे करण्यात येत आहेत. बैठकीमध्ये वेगवेगळे प्रस्ताव ठेवले जात आहेत. यावरून ‘वंचित’च्या महाविकास आघाडीमधील सहभागा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर मविआचे प्रमुख नेते आणि शिवसेनेच्या उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांना नक्कीच महाविकास आघाडीत यायचे आहे. ते वेगळी वाट निवडतील असे वाटत नाही. ज्याप्रकारे देशात सरकारकडून कायदा, संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि लोकशाही पायदळी तुडविली जात आहे. त्यामुळे देशातीला दलित, वंचित समाज अस्वस्थ झाला आहे. काहीही झाले तरी आता अशी हुकूमशाही आपण सहन करायची नाही, अशी या समाजांची स्पष्ट भूमिका असल्यामुळे ते आपल्या नेत्यांवर दबाव निर्माण करत आहेत. त्यामुळे देशातील दलित, अल्पसंख्याक व वंचित समाज सर्वशक्तीने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपाची सुपारी घेऊन त्यांना मदत करेल असे वाटत नसल्याचे राऊत बोलले. प्रकाश आंबेडकर हे त्या प्रकारचे नेते नाहीत असेही संजय राऊत म्हणाले.
प्रकाश आंबेडकर तुमच्याबरोबर नक्की येतील याची तुम्हाला खात्री आहे का? कारण सध्याची राजकीय परिस्थिती, प्रकाश आंबेडकरांची वक्तव्ये, स्वबळाचा नारा, त्यांच्या मागण्या आणि प्रस्ताव पाहता युतीचा बार फुसका आहे, युतीचा पोपट मेलाय असं बोललं जातंय. याबद्दल संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता, राऊत म्हणाले, युतीचा बार फुसका आहे, पोपट मेला आहे असे तुम्हीच म्हणता. मुळात आमचा पोपट झालेलाच नाही. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची आधीपासूनच युती आहे. याची सर्वांना कल्पना आहे. राज्यातील डावे पक्षदेखील आमच्याबरोबर उभे आहेत. त्यामुळे प्रसार माध्यमांनी प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकांवरून अशा प्रकारचा पोपटाचा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. प्रकाश आंबेडकरां सोबत आमची युती होईलच.
खासदार राऊत पुढे म्हणाले की, 2019 आणि त्याआधी आम्ही प्रकाश आंबेडकरांशिवाय लढलो आहोत. परंतु यावेळी त्यांनीच महाविकास आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे त्यांच्या पक्षाला सहभागी केल आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी आमच्याबरोबर असावी, असे आम्हालाही वाटते. त्यामुळे आम्ही वेळोवेळी त्यांच्याशी सन्मानाने चर्चा केली असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.