Home » वडेट्टीवार म्हणाले; अकोला लोकसभेवर आमचा दावा

वडेट्टीवार म्हणाले; अकोला लोकसभेवर आमचा दावा

by नवस्वराज
0 comment

अकोला : पश्चिम विदर्भातील महत्वाचा लोकसभा मतदार संघ असलेल्या अकोल्यावर काँग्रेसने दावा केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात थेट दावा करणारे विधान केले आहे. अकोला लोकसभा मतदार संघ सुरुवातीपासून काँग्रेसकडे राहिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्येही हा लोकसभा मतदार संघ काँग्रेसकडेच राहिल असे विधान वडेट्टीवार यांनी केले आहे.

राज्यात काँग्रेस, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी गट यांच्यात महाविकास आघाडी कायम आहे. अशात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये अकोला लोकसभा मतदार संघ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात वडेट्टीवार यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. अकोला लोकसभा मतदार संघावर आमचाच (काँग्रेस) दावा आहे असे त्यांनी स्पष्ट केले. ठाकरे गटाने अकोला लोकसभा मतदार संघ त्यांना मिळावा याबाबत मागणी केली असली, तरी या मतदार संघावर ठाकरे गटाचा दावा असण्याचे कोणतेही कारण नाही असे वडेट्टीवार म्हणाले.

महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे समीकरण अगदी स्पष्ट आहे. ठरल्याप्रमाणचे लोकसभा व विधानसभेच्या जागांचे वाटप व्हायला पाहिजे असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. अशात ठाकरे गटाने अकोला लोकसभा मतदार संघावर दावा केल्यास यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असेही वडेट्टीवार यांनी नमूद केले. मात्र आम्ही (काँग्रेस) अकोला लोकसभा मतदार संघावर दावा करणार आहोतच असे ते म्हणाले. विधानसभांच्या जागा वाटपावरून अकोल्यात तिढा निर्माण होऊ शकतो. वंचित बहुजन आघाडी सोबत आल्यास ते अकोल्यातील विधानसभा मतदार संघावर दावा करू शकतात. त्यापैकी एका विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या ठाकरे गटाची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. ‘वंचित’ला घेऊन अकोल्यातील ठाकरे गटाचे ‘वेट अॅन्ड वॉच’ सुरू आहे. याबाबत मात्र वडेट्टीवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया नोंदविली नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!