Mumbai : शहरी भागात वास्तव्यास असलेल्या राज्यभरातील आदिवासी कुटुंबानाही शबरी आवास घरकुल योजनेचा लाभ आता मिळणार आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे शहरी भागातील आदिवासींनाही हक्काचे घरकुल मिळणार आहे.
आदिवासी उपयोजनेअंतर्गत अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्यावतीने शबरी आवास घरकुल योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ केवळ ग्रामीण भागातील आदिवासींना मिळत होता. त्यामुळे शहरी भागातील आदिवासी घरकुलापासून वंचित होते. राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा-मातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात, अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राबविण्यात येतो. (Urban Tribal will also get benefit of Houshing Scheme)
शबरी आवाज योजना शासन निर्णयानुसार ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात राबविणे अपेक्षित होते. मात्र ग्रामविकास विभागाच्या 10 फेब्रुवारी 2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व सनियंत्रण करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष (ग्रामीण गृहनिर्माण) स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे ग्रामविकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग व राज्य शासनाच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व ग्रामीण घरकुल कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येते. त्यामुळे शहरी भागात शबरी आदिवासी घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा नसल्याने शहरी भागातील आदिवासी कुटुंब घरकुलापासून वंचित राहात आहेत.
शहरी भागातील ही बाब सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांच्यामार्फत आदिवासी कुटुंबासाठी शबरी घरकुल योजना राबवावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. नगर विकास विभागाला आदिवासी विकास विभागामार्फत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. या प्रस्तावास नगर विकास विभागाने सहमती दर्शवली. त्यामुळे आता शहरी भागातील पात्र आदिवासी लाभार्थ्यांना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत 11 जानेवारी 2024 रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे.
शबरी योजनेअंतर्गत घरकुल बांधकामाचे चटई क्षेत्र 269 चौरस फूट आहे. घरकुल बांधकामासाठी अनुदान रक्कम ही 2 लाख 50 हजार राहील. अनुदान रक्कम ही चार टप्प्यात लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल. यात घरकुल मंजुरी मिळाल्यानंतर 40 हजार रुपये, प्लिंथ लेवल 80 हजार, लिंटल लेवल 80 हजार आणि घरकुल पूर्ण झाल्यानंतर 50 हजार असे एकूण 2 लाख 50 हजार रुपये अनुदान आहे.