अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उपेंद्र बाबाराव पाटील यांनी चक्क शर्ट न घालता उमेदवारी अर्ज दाखल केला. हा प्रकार बहुधा पहिल्यांदाच झाला असावा. याची जोरदार चर्चाही सुरू आहे.
पाटील बनियनवर अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात येत असताना त्यांना पोलिसांनी रोखले. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांनी परवानगी दिल्याने त्यांना आत सोडण्यात आले. पांढरपट्टे यांनी पाटील यांचा अर्ज स्वीकारला. पाटील यांचे सहकारीसुद्धा बनियनवर विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात आले होते.
कायम विनाअनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुसार १०० टक्के अनुदान मिळेपर्यंत अशाच प्रकारे वर्तन करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. पटसंख्येचा निकष लावून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करू नये, शिक्षक, कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, पदवीधर बेरोजगार यांना न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.