मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला होता. राज्यपालांनी ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते, परंतु बहुमतासाठी आवश्यक ती संख्याच नसल्याचे ध्यानात आल्याने ठाकरे यांनी राजीनामा दिला.
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेने दाखल केलेल्या बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी, “आज मला विशेषतः शरद पवार आणि सोनिय गांधी आणि सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहे. आज निर्णय घेतांना फक्त चार शिवसेनेचे मंत्री होते. बाकीचे तुम्ही जाणताच. या निर्णयाला कोणी विरोध केला नाही, सर्वांनी मान्यता दिली. ज्यांचा विरोध आहे हे भासवलं जात होतं त्यांनी पाठिंबा दिला,” असे म्हणत सहकारी पक्षांचे आभार मानले.
“ज्यांना दिलं ते नाराज, ज्यांना नाही दिलं ते हिमतीने सोबत आहे, याला म्हणतात माणुसकी, याला म्हणतात शिवसेना,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पाठिंबा देण्यासाठी शिवसेना भवनावर येणाऱ्या समर्थकांचे आभार मानले. “राज्यपाल महोदयांना धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी लोकशहीचा मान राखलात, एक कॉपी दिल्यावर २४ तासात आदेश दिला,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांमध्ये राज्यपालांचे आभार मानले. तसेच विधानपरिषदेच्या १२ आमदारांची यादी राज्यपालांनी मंजूर केली असती तर मान अधिक वाढला असता, असेही ते म्हणाले. “मला प्रमाणिकपणे असं वाटतं की शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचण्याचं पुण्य मिळत असेल तर ते त्यांना मिळू द्या,” अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली.