अकोला : विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईकडे निघालेल्या खासदार भावना गवळी यांच्यापुढे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी घोषणाबाजी केल्याने अकोला रेल्वे स्थानकावर काही काळ तणाव निर्माण झाला होता.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्यात जबरदस्त बाचाबाचीही झाली. खासदार गवळी विदर्भ एक्स्प्रेसने मंगळवारी रात्री अकोला रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे जात होत्या. त्यावेळी राऊत आणि गवळी समोरासमोर आलेत. राऊत यांना सोडण्यासाठी काही कार्यकर्ते, पदाधिकारी रेल्वेस्थानकावर आले होते. उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून भावना गवळी यांना पाहताच ‘गद्दार.. गद्दार..’ अशी घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी आमदार नितीन देशमुख हे देखील उपस्थित होते. परस्पर नारेबाजीमुळे अकोला रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला. रेल्वेत बसलेल्या खासदार भावना गवळी समोर येताच त्यांच्यासमोर ‘५० खोके एकदम.. ओके..’ अशा घोषणाही देण्यात आल्या.