नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाला सातत्याने फोन करून धमकी देणारा कुख्यात नरेश पुजारीवर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला जाणार आहे. जयेशने अनेकदा फोन करून गडकरी यांना मारण्याची व कार्यालय उडवून देण्याची धमकी दिली होती.
जयेश पुजारी ऊर्फ शाकीर यांचे संबंध पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी असल्याचे तपासात उघड झाले आहे. दाऊद इब्राहीमपर्यंत त्याचे संबंध जात असल्याने नागपूर पोलिसांनी कोणताही जोखीम न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगावच्या तुरुंगात कैद असताना १४ जानेवारी आणि २१ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीने फोन केला होता. पहिल्यांदा त्याने १०० कोटी रुपयांची आणि दुसऱ्यांदा १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. दाऊदसोबतच श्रीलंकेतील प्रतिबंधित एलटीटीईसोबतही तो संपर्कात होता.
या प्रकरणाचा तपास लवकरच केंद्रीय तपास यंत्रणांकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जयेश पुजारीने काही वर्षांपूर्वी धर्मपरिवर्तन केले आहे. त्यानंतर त्याचा नाव शाकीर ठेवण्यात आले आहे. पोलीस चौकशीत जयेश नाव उच्चारताच तो माझे नाव शाकीर असल्याचे सांगून आक्षेप घेतो. धमकी देताना जयेश बेळगावच्या तुरुंगातून स्मार्ट फोनच्या माध्यमातून आपल्या पत्नी व इतर महिला मित्रांशी सतत व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होता.
नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन करणारा आरोपी सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. हत्येच्या दोन प्रकरणांमुळं जयेश पुजारीला जन्मठेप मिळाली होती. बेळगाव तुरुंगत तो शिक्षा भोगत होता. जयेश पुजारीला काहीही करुन बेळगावच्या तुरुंगातून बाहेर निघायचे होते. त्यासाठीच तुरुंगातून असे काही कृत्य करायचे की दुसऱ्या ठिकाणी गुन्हा नोंद होऊन तिथे नेण्यासाठी पोलिस इथून बाहेर काढतील आणि संधी मिळताच पळून जायचं अशी त्याची योजना होती. पुजारीला जन्मठेपेची शिक्षा झालीय. त्यामुळं त्याने जेलमधून पळून जाण्यासाठी जेलमधूनच गडकरींच्या कार्यालयात फोन करुन धमकी दिली होती.