नागपूर : आपल्या देशात विविध राज्य आणि केंद्र सरकार गरजेनुसार अनेक प्रकारची एलिट सुरक्षा देते. सामान्यतः हे संरक्षण देशातील एलिट (महत्वाचे व्यक्ती) लोकांना दिले जाते. कोणला कोणती सुरक्षा दिली जाते? त्याचे स्वरुप काय असते ? चला जाणून घेऊया.
भारतातील सुरक्षा व्यवस्था पाच प्रकारात विभागली गेली आहे. झेड प्लस (Z+), (उच्च पातळी), झेड (Z), वाय प्लस (Y+), वाय (Y) आणि एक्स (X) श्रेणी. या चार श्रेणींमध्ये कोणाला कोणत्या स्तरावर संरक्षण द्यायचे हे सरकार ठरवू शकते.
झेड प्लस सुरक्षा
झेड प्लस सुरक्षा ही देशाची दुसरी मोठी सुरक्षा आहे. यात 36 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्य आणि केंद्र सरकार ती पुरविते. राज्य सरकारने ती पुरविल्यास राज्य सरकार पोलिसांना सुरक्षा रक्षक नेमते. केंद्र सरकारने ती दिल्यास केंद्रीय सुरक्षा यंत्रणा मनुष्यबळ नेमते. राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाच्या झेड प्लस सुरक्षाप्राप्त व्यक्तींच्या कवचात 36 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. केंद्राच्या झेड प्लसमध्ये 10 एनएसजी (National Security Guards) आणि एसपीजी (Special Protection Group) कमांडो तसेच काही पोलिसांचा समावेश असतो. राज्याच्या झेड प्लस मध्ये राज्य पोलिसांची एसपीजी आणि ईतर पोलिस असे 36 सुरक्षा रक्षक असतात. सुरक्षाप्राप्त व्यक्तीला आणि त्यांच्या रक्षकांसाठी वाहन ताफा असतो.
झेड सुरक्षा
झेड सिक्युरिटीमध्ये 22 सुरक्षा कर्मचारी असतात. या सुरक्षेत एक ते दोन एस्कॉर्ट्स आणि एक पायलट वाहने असतात. एक सरकारी वाहन सुरक्षाप्राप्त व्यक्तीसाठी असते.
वाय प्लस आणि वाय सुरक्षा
सुरक्षिततेचा हा तिसरा आणि चौथा स्तर आहे. हे संरक्षण कमी जोखीम असलेल्या लोकांना दिले जाते. यामध्ये 11 सुरक्षा कर्मचारी वाय प्लस सुरक्षेत सहभागी असतात. यात दोन कमांडो असतात. वाय सुरेक्षत 4 ते 8 कर्मचारी असतात. यात गरजेनुसार एक ते दोन कमांडो तैनात करण्यात येतात.
एक्स सुरक्षा
या श्रेणीत दोन सुरक्षा रक्षक तैनात असतात. यात कोणतेही कमांडो सहभागी नसतात. याशिवाय महाराष्ट्रात काही खासदार, आमदारांना, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांना एक पिस्तूलधारी सुरक्षा रक्षक पुरविण्यात आला आहे. ही सुरक्षा कोणत्याही श्रेणीत येत नाही.